मराठवाड्यातील औरंगाबादमध्ये पाणी टंचाईची समस्या जाणवू लागली आहे. त्यामुळे पाण्यासाठी नागरिक पालिकेवर मोर्चा काढून संताप व्यक्त करत आहेत. याचपार्श्वभूमीवर गुरुवारी महाराष्ट्र क्रांतीसेनेने मोर्चा काढला होता. पाण्यासाठी त्रासलेल्या नागरिकांचे नेतृत्व ‘गोल्डमॅन’ मारुती भालेराव यांनी केले. औरंगाबादेत दर चार दिवसाला पालिकेवर पाण्यासाठी मोर्चा धडकतोय. कुठे पाण्याची लाइन नाही, कुठे कमी दाबाने पाणीपुरवठा होत नाही तर कुठे गटार आणि पाणी लाइन जवळ असल्याने नागरिकांना दूषित पाणी पुरवठा होतोय. या समस्येकडे पालिकेचे लक्षवेधण्यासाठी महाराष्ट्र क्रांती सेनेने मोर्चा काढला. पाण्यासारख्या मूलभूत गोष्टीसाठी ‘गोल्डमॅन’ लढा देताना दिसतोय.

सात हजार लोकवस्ती असलेल्या औरंगाबाद पालिकेच्या मिसरवाडी परिसरात पाण्याची लाइन नाही. मिसरवाडीचा महापालिकेत समावेश होऊन २०-२५ वर्षे झालीत. मात्र, अद्याप पाणी नसल्याने नागरीकांमधून संताप व्यक्त केला जातोय. यापार्श्वभूमीवर गुरुवारी ८ ते १० किलोमीटर अंतर पाई चालत मोठ्या प्रमाणात महिलांनी पालिकेवर हंडा मोर्चा काढला. ‘ घोटभर पाण्यासाठी आमचा लढा आहे, आणि आम्हाला ते मिळावं एवढीच अपेक्षा आहे’ असं मत मोर्च्यात सहभागी झालेल्या महिलांनी व्यक्त केलं. यावेळी पालिका प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. मात्र, या सगळ्यांमध्ये मोर्चाचं नेतृत्व करणाऱ्या मारुती भालेराव यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतलं.

gold-3

पाण्यासाठी लढा देताना त्यांच्या अंगावर घातलेल्या सोन्याने त्यांच्या संपत्तीचं ओंगळवान दर्शन घडत होते. लाखाचे सोन घालून मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या भालेकरांशी ज्यावेळी संवाद साधला त्यावेळी ते ५० हेक्टरचे बागायतदार असल्याचे समजले. यावेळी ते भालेराव म्हणाले की, अनेक गरिबांचे विवाह पार पाडले आहेत. मिसरवाडीकरांचा पाणी प्रश्न गंभीर आहे. त्यामुळे मी त्यांच्यासोबत आवाज उठवला आहे. आणखी एकदा लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करु.’ विनवणी करुन देखील पालिकेने सहकार्य केले नाही ,तर अंगावरचं सोनं मोडून पाणी प्रश्न सोडविणार असल्याचे गोल्डमॅन’ मारुती भालेराव यावेळी म्हणाले.