केवळ ३० मिनिटांसाठी औपचारिकता म्हणून जेलभरो आंदोलन पार पाडल्यामुळे शेतकऱ्यांची पुरती निराशा झाली. मागण्या मान्य करून घेण्यास जन्मभर जेलमध्ये जाण्याची तयारी आहे, अशा घोषणा देत आंदोलनात सहभागी झालेल्या शेतकऱ्यांचा पुरता अपेक्षाभंग झाला. माजी खासदार डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी स्वत:ला पोलिसांच्या स्वाधीन केले आणि १० मिनिटांत पुन्हा सारेच बाहेर पडले. अवघ्या ३० मिनिटांत आंदोलन गुंडाळल्यामुळे यातून पदरात काय पडले, याचीच चर्चा सर्वाधिक होती.
महिनाभरापूर्वी तब्बल ३५ वर्षांनंतर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार उस्मानाबादेत रस्त्यावर उतरले होते. त्यांच्या सोबतीला हजारो शेतकरी सरकारविरोधात घोषणाबाजी करीत मोर्चात सहभागी झाले. महिनाभरात मागण्या मान्य न झाल्यास जनावरांसह जेलभरो आंदोलन करण्याचा इशारा पवारांनी दिला होता. आम्ही रस्त्यावर उतरल्यावर राज्यातील कारागृहे कमी पडतील, असेही सर्वच नेत्यांनी या वेळी जाहीर केले. जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी राष्ट्रवादीने जेलभरोची जय्यत तयारी केली होती. एकूण १० ठिकाणी आंदोलनाची औपचारिकता पार पडली. अटक करवून घेतलेले नेते, कार्यकत्रे व मोठय़ा अपेक्षेने सहभागी शेतकरी १० मिनिटांत पोलिसांच्या ताब्यातून बाहेर पडले. उस्मानाबाद शहरात शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या इमारतीमध्येच तात्पुरते जेल तयार केले होते. हाकेच्या अंतरावर असलेल्या कार्यकर्त्यांनी साडेअकराच्या सुमारास स्वत:ला पोलिसांच्या ताब्यात दिले. इमारतीच्या खिडक्यांना असलेल्या गजांना धरून फोटोसेशन झाले. नंतर अवघ्या ३० मिनिटांत हा सर्व फार्स राज्य सरकारकडून कोणतेही ठोस आश्वासन न मिळताच गुंडाळण्यात आला. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली शहरात आंदोलन होणार होते. मात्र, ऐनवेळी आंदोलनाची धुरा माजी खासदार डॉ. पाटील यांनी स्वत:च्या खांद्यावर घेतली. आव्हाड उस्मानाबादमध्ये फिरकलेच नाहीत. ढोकी येथे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. ढोकी पोलीस ठाण्याच्या आवारात कार्यकर्त्यांसह नेतेमंडळी आणि सहभागी झालेल्या शेतकऱ्यांनी स्वत:ला अटक करवून घेतली. थोडय़ा वेळाने सर्वाची सुटका झाली.
उस्मानाबाद, ढोकी, परंडा येथे डॉ. आंबेडकर चौक ते छत्रपती शिवाजी चौक मार्गावर आमदार राहुल मोटे यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कळंबमध्ये जि. प. सदस्या अर्चना पाटील यांच्या नेतृत्वाखाली अर्धा तास आंदोलन झाले. उमरगा येथे जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुरेश बिराजदार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले.
आमदार पाटील यांचा दावा
जिल्ह्यात आंदोलनासाठी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांसह शेतकरी मोठय़ा संख्येने रस्त्यावर उतरले होते. आंदोलनात २५ हजारपेक्षा अधिक कार्यकत्रे, शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविल्याचा दावा आमदार पाटील यांनी केला. आंदोलनानंतर राष्ट्रवादी भवन येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी आमदार नरेंद्र बोरगावकर यांची उपस्थिती होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी व शरद पवार यांच्या भेटीच्या पाश्र्वभूमीवर आंदोलनाची दिशा थोडीशी बदलण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 15th Sep 2015 रोजी प्रकाशित
अर्धा तास आंदोलन; १० मिनिटांची अटक!
केवळ ३० मिनिटांसाठी औपचारिकता म्हणून जेलभरो आंदोलन पार पाडल्यामुळे शेतकऱ्यांची पुरती निराशा झाली.
Written by बबन मिंडे
First published on: 15-09-2015 at 01:10 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Half hours agitation arrest in ten minutes