छत्रपती संभाजीनगर : शेतीतून मिळणारे उत्पन्न वाढावे म्हणून सुरू करण्यात आलेला हार्वेस्टरचा व्यवसाय अतिवृष्टीमुळे अडचणीत आला आहे. पिके पाण्यात गेल्याने यंत्राद्वारे पिके काढण्यास कोणी शेतकरी पुढाकार घेत नसल्याने हार्वेस्टरचे व्यावसायिक गोत्यात आले आहेत.‘ऑक्टोबरअखेरपर्यंत शेतातील खरिपाच्या पिकांवर हार्वेस्टर फिरून मोकळा होतो. मजूर टंचाईमुळे दर वर्षी हार्वेस्टरची मागणी वाढत आहे. चांगल्या व्यवसायामुळे हप्ते फेडण्याचे गणित सुटून जाते. पण यंदा रानात पीक राहिले नाही. अतिवृष्टीने शेतकऱ्यांसोबत हार्वेस्टर यंत्र चालवणाऱ्यांचेही भवितव्य चिखलात फसले आहे. शेतीच्या जोड व्यवसायासाठी म्हणून घेतलेल्या सुमारे सहाशे हार्वेस्टर चालकांपुढे बँकेचे हप्ते भरण्याचे मोठे संकट उभे ठाकले आहे.’ किशोर नागरे गावागावांत अडकून पडलेल्या हार्वेस्टरमागच्या कारणांचे दुखणे मांडत होते.

छत्रपती संभाजीनगरजवळच्या आडगावचे नागरे हे रहिवासी. काही वर्षांपूर्वी त्यांनी हार्वेस्टर स्वत: आधी विकत घेतला. त्यानंतर त्यांनी वितरक म्हणूनही काम सुरू केले. शेतकऱ्यांना हार्वेस्टरचे बहुपयोग सांगून त्यातल्या जोड धंद्यामागच्या नफ्याचे गणित समजावून सांगत मराठवाड्यात सहाशेपेक्षा अधिक हार्वेस्टरची विक्री केल्याचा दावा नागरे करतात.

हार्वेस्टरमध्ये दोन प्रकार असून, एकाच्या माध्यमातून सोयाबीन, तूर, मका, उडीद, मूग, बाजरी आदी पिकांची कापणी होते. तर, उसासाठी स्वतंत्र हार्वेस्टर असते. उसाव्यतिरिक्त पिकाच्या एका हार्वेस्टरची किंमत गतवर्षी २६ लाखांपर्यंत होती. यंदा ३४ लाख झाली आहे. २६ लाख रुपयांना घेतलेल्या हार्वेस्टरसाठी साधारण १७ ते २० लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मंजूर होते. ७ ते ८ लाखांची सवलत मिळते. कर्ज फेडण्यासाठी साधारणपणे सहा महिन्यांसाठी ३ लाख २० हजारांचा हप्ता बसतो. सहा महिन्यांचे दहा हप्त्यांत कर्ज फेडावे लागते. साधारणपणे एका हंगामात गहूकापणीतून ५ लाखांचा, तूर व सोयाबीन काढणीतून प्रत्येकी दोन लाख व इतर पिकांमधून मिळून वार्षिक आठ ते दहा लाखांचा सर्व खर्च जाता नफ्याचे गणित असते. परंतु यंदा ऊस सोडून अन्य पिके चिखलातच रुतून बसल्याने खरेदी केलेल्या हार्वेस्टरला कापणीचे काहीच काम राहिले नसल्याने चालक अडचणीत सापडले आहेत.

हार्वेस्टर चालकांचे यंदा हाल सुरू आहेत. पिकेच शेतात राहिली नसल्याने कापणीच्या व्यवसायातून मिळणाऱ्या नफ्यावरच्या आशेवरच पाणी फेरले गेले. शेतीला जोड व्यवसाय म्हणून मागील तीन वर्षांमध्ये सहाशे हार्वेस्टर खरेदीदारांपुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे.किशोर नागरे, हार्वेस्टर मालक