औरंगाबाद : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादचे नाव संभाजीनगर व्हावे यासाठी मनसेकडून आता आग्रह धरला जाणार आहे. विधिमंडळात या अनुषंगाने मागणी करू, असे आमदार राजू पाटील यांनी सांगितले. एका बाजूला हिंदुत्वाचा नारा हाती घेतला जात असताना ५७ ते ७० जागांवर उमेदवार उभे करण्याची तयारी मनसेकडून केली जाणार आहे. त्या तयारीचा भाग म्हणून १३ ते १६ फेब्रुवारी या कालावधीत राज ठाकरे औरंगाबाद येथे येणार आहेत. विशेष म्हणजे त्यांचा गुलमंडी शाखेच्यावतीने सत्कार करण्यात येणार आहे.
गुरुवारी सायंकाळी चार वाजता पुण्याहून औरंगाबाद शहरात आल्यानंतर बाबा पेट्रोल पंपावर त्यांचे स्वागत केले जाईल. गुलमंडीवर त्यांचा सत्कार केला जाईल. गुलमंडी हे शहराचे नाक मानले जाते. या भागात शिवसेनेचा दबदबा आहे असाही दावा अनेक वर्षांपासून केला जातो. तेथे राज ठाकरे यांचा सत्कार आयोजित करून शिवसेनेला आव्हान देत असल्याचा संदेश मनसेकडून दिला जात आहे. १४ फेब्रुवारी रोजी मनसेमधील पदाधिकाऱ्यांशी राज ठाकरे भेटणार असून १५ फेब्रुवारीला शिक्षक संघटनेच्यावतीने होणाऱ्या कार्यक्रमाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर पदाधिकाऱ्यांचा जाहीर मेळावाही राज ठाकरे घेणार असून या दरम्यान हिंदुत्ववादी संघटनांचे प्रतिनिधी, गड-किल्ले संवर्धनासाठी झटणारी मंडळी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांच्या गाठीभेटी राज ठाकरे घेणार आहेत.
राज ठाकरे यांच्यासोबत पक्षाचे नेते बाळा नांदगावकरदेखील शहरात येत आहेत. शिवसेनेने शहर खड्ड्यात घातले आहे. रस्ते, कचरा, पाणी या मूलभूत सुविधाही नागरिकांना मिळत नाही. मतदार निराश आहेत. निवडणुकीच्या माध्यमातून आता तो राग व्यक्त व्हावा, असे प्रयत्न प्रचारादरम्यान मनसेकडून होतील. त्याचवेळी हिंदुत्वाची भूमिकाही अधिक प्रखरपणे मांडली जाईल, असे मनसे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर यांनी सांगितले.