औरंगाबाद : राज्याकडून मिळालेल्या लसीच्या प्रमाणात मराठवाडय़ात ७४.२६ टक्के लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. यामध्ये एक लाख १९ हजार ४५४ आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिली मात्रा, तर ५३ हजार ६६९जणांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. औरंगाबाद शहरात आणि जिल्ह्यात पोलीस दलात लसीकरणाचा वेग अधिक असून कोविड नियंत्रणासाठी अग्रभागी असणाऱ्यांनी लसीकरणाला वेग दिला. आतापर्यंत अग्रभागी काम करणाऱ्या एक लाख २३ हजार ५९९ जणांना पहिली मात्रा, तर २८ हजार २२३ जणांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. ४५ वर्षांपेक्षा अधिक वयोगटातील व्यक्तींही आता रांगा लावून लस घेण्यास तयार आहेत. अगदी ग्रामीण भागातही हे चित्र दिसत असून आता लस वितरण अधिक चांगल्या पद्धतीने करावे अशी मागणी वाढू लागली आहे. परभणी जिल्ह्यत लसीकरणाचे शेकडा प्रमाण सर्वाधिक म्हणजे ८९.८९ एवढे आहे. रविवारी औरंगाबादसह बहुतांश शहरात लसीकरणाला वेग दिला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मराठवाडय़ातील लसीकरणाचा वेग इतर विभागाच्या तुलनेत अधिक असून नव्याने २८ लाख २९ हजार २८० लस देण्यात यावी अशी मागणी नोंदविण्यात आली आहे. जेथे संसर्ग अधिक तेथे अधिक लसीकरण असे सूत्र अवलंबावे आणि लस अधिकाधिक उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली जात आहे. दरम्यान, मराठवाडय़ातील रुग्णसंख्या वाढत असल्याने ४५ वष्रे वयोगटातील लोकसंख्या गृहीत धरुन नियोजन केले जात आहे. लस मात्रा वेळेवर मिळाल्या तर लसीकरणाला अधिक वेग देता येईल असे चित्र दिसत असून पहिल्या टप्प्यातील गरसमज आता पूर्णत: कमी झाले असल्याने लसीकरण केंद्राबाहेर रांगा लागल्याचे चित्र सर्वत्र आहे. गेल्या दोन दिवसापासून लसीकरणाला वेग आला आहे. मात्र, खासगी रुग्णालयात काही ठिकाणी लस मात्रा कमी पडत आहेत. दरम्यान, औरंगाबाद शहरासाठी सोमवारी  नव्याने लस मिळणार असल्याने रविवारी लसीकरण मोठय़ा प्रमाणात हाती घेतले जाणार आहे.

प्रतिसाद नसलेले लसीकरण केंद्र हलविण्याचा निर्णय

औरंगाबाद शहरात करोना संसर्गाचा उद्रेक वाढतच चालला आहे. त्यामुळे बाधित रुग्णांची संख्या देखील वाढत आहे. करोना संसर्ग रोखण्यासाठी ११५ वॉर्डात महा लसीकरण मोहीम राबवली जात आहे. लसीकरणाला सर्वत्र चांगला प्रतिसाद मिळत असलातरी  झोन क्रमांक एक, दोन आणि तीन मधील काही वॉर्डात नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे हे लसीकरण केंद्र इतरत्र हलवण्याचा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. गेल्या चार दिवसात साडेचार ते पाच हजार नागरिकांचे लसीकरण होऊ शकले. झोन क्रमांक चार ते नऊ मधील वॉर्डातील नागरिकांकडून लस घेण्यासाठी सेंटरवर गर्दी होत आहे. झोन क्रमांक एक, दोन, तीन मधील काही वॉर्डातील नागरिकांकडून लसीकरणाला प्रतिसाद मिळाला नाही. पहिल्या दिवसापासून या ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या सेंटरमध्ये लस घेण्यासाठी नागरिक येत नसल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या झोनमधील केंद्र इतरत्र हलविण्यात आले आहेत. तुकाराम हॉस्टेल मधील सेंटर सुरेवाडीत हलवले जाणार असून पदमपूरा भागातील संत तुकाराम हॉस्टेलमध्ये कोविड  केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. त्यानंतर हे कोविड  सेंटर बंद करुन त्या ठिकाणी लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. परंतु या सेंटरवर नागरिक लस  घेण्यासाठी येत नसल्यामुळे हे लसीकरण सेंटर सुरेवाडीत हलविण्यात आले. तसेच कैलासनगर-अजबनगर हा वॉर्ड मोठा असल्यामुळे कैलासनगर मधील अमर प्राथमिक शाळेत लसीकरण सेंटर सुरू केले. हे केंद्रही हलविण्यात येणार आहे.

मराठवाडा लसीकरण तक्ता

जिल्ह्यचे नाव        मिळालेली लस        वापरलेली लस        शेकडा प्रमाण

औरंगाबाद                   ३४०२२०             २५८८९३                     ७६.१०

हिंगोली                        ५८९२०               ४८३११                       ८१.९९

जालना                        १७१२२०              ९१२०९                      ५३.२७

परभणी                       १००९००               ९०६९९                      ८९.८९

बीड                              १७६७१०              १४०४८०                   ७९.५०

लातूर                            १८३५८०               १४३४०६                  ७८.१२

नांदेड                            २७००५०               १८४५३३                   ६८.३३

उस्मानाबाद                   ८८९६०                 ७५०७४                     ८४.३९

एकूण                         १३९०५५०                १०३२६०५                ७४.२६

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: In marathwada over 74 percent vaccination completed zws
First published on: 10-04-2021 at 02:02 IST