छत्रपती संभाजीनगर : जगण्याची भ्रांत घेऊन वर्षभर खेळणी विकणाऱ्या राजस्थानातील २९ वर्षाच्या कृष्णाला स्वातंत्र्य दिनाच्या दोन दिवस आधी चिंता होती, आपण घेतलेल्या तिरंगा ध्वजाची प्रतिकृती विकली जाईल ? पुढील दोन दिवसांत दोन – अडीच हजार रुपयांचा लाभ मिळेल, या आशेवर जगणाऱ्या त्याच्या सारख्या २५ – ३० जणांना चिंता होती – ‘या वर्षी तरी आपला स्वातंत्र्य दिन साजरा होईल ?
रेल्वे स्टेशन जवळील एका वस्तीत कृष्णा त्याच्या पत्नी आणि बाळासह राहतो. जगण्यासाठी लागणाऱ्या किमान गोष्टी तरी विकत घेता याव्यात, या काहीशा आशेने त्याचा रोजचा दिवस सुरू होतो. स्वातंत्र्य दिनाच्या दोन दिवस आधी त्याने तिरंगा ध्वज, बॅजेस, स्टिकर विकण्यासाठी रस्त्याच्या कडेला असणाऱ्या फुटपाथचा आसरा घेतला. लहान-मोठ्या आकाराचे तिरंगा ध्वज एका बादलीत माती टाकून त्यात रोवले. त्याबरोबरच इतर साहित्य एका छोट्या टेबलावर मांडून ठेवले. त्यानंतर कृष्णा हा पत्नी व तिच्या कुशीतील बाळासह स्टॉलजवळ बसला. कृष्णाने सांगितले, या तीन-चार दिवसांत चार-पाच हजार रुपयांचे सामान विकून दोन-अडीच हजार रुपये उरतात. लहान मुलांनाच राष्ट्रध्वज खरेदीची ओढ असते. सगळे सामान रेल्वेने येते.
शहरातील दुसऱ्या एका चौकात राष्ट्रध्वज व इतर साहित्य विक्री करण्यासाठी एक स्टॉल राजस्थानहूनच आलेल्या रामचरण (वय ३५ वर्ष) यांनी लावला आहे. रामचरण यांच्या स्टॉलवर देखील त्यांची पत्नी कुशीत बाळ सांभाळत पतीच्या कारभाराला हातभार लावताना दिसून आली. दोन-अडीच हजारांचा नफा कमावून १५ ऑगस्टनंतर रामचरण देखील इतर व्यवसायाकडे वळतात. कृष्णा आणि रामचरण या दोघांचेही वास्तव्य रेल्वे स्टेशन जवळील वस्तीतच. स्वत:सह कुटुंबाचे दोन वेळा पोट भरण्याची भ्रांत दोघांचीही सारखीच.
दरम्यान, क्रांती चौकात तिरंगा ध्वजाची प्रतिकृती विकणारे म्हणाले, दहा हजारांचा माल विकला तर आम्हाला तीन-चार हजार रुपये उरतात. पण, इतकी विक्री होत नाही. १५ ऑगस्टनंतर आम्ही लहान मुलांची खेळणी विकतो. एका ठिकाणी न राहता आमचा एका शहरातून दुसऱ्या शहरात प्रवास कायम सुरूच असतो. दरम्यान, देश आज ७९ वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहे. पण, सिग्नलवर, चौकांमध्ये तिरंगा ध्वजाची प्रतिकृती विकणाऱ्या कृष्णाला प्रश्न पडला आहे, की यावर्षी तरी माझा स्वातंत्र्य दिन साजरा होईल ?