जगभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या वेरूळ येथील कैलास लेणीमध्ये अलीकडेच दरड पडल्याच्या घटनेचा अहवाल पुरातत्त्व विभागाने तयार केला असला, तरी तो राज्य पर्यटन विभागाला अजूनही दिला गेला नाही. दरड खाली आली त्या दक्षिण भागातही नव्याने चर खणता येतील का, याचा विचार केला जात आहे. या भागात कोणतेही काम हाती घेतले तरी त्याचा परिणाम १५ क्रमांकाच्या लेणीवर पडण्याची शक्यता असल्याने जागतिक पर्यटन केंद्र असणाऱ्या लेणींच्या संर्वधनासाठी नाचविले जाणाऱ्या कागदपत्रांचा प्रवास कासवगतीनेच सुरू आहे.
वेरुळच्या कैलास लेणीमध्ये डोंगराचा काही भाग पडल्याने लेणीस धोका असल्याचे दिसून आले होते. भारतीय भूगर्भशास्त्र विभागाने या डोंगराचा अभ्यास करून कोणते भाग कमकुवत व कोणते अधिक चांगले याचा अहवाल पुरातत्त्व विभागास दिला होता. मात्र, कमी कालावधीत अधिक वेगाने पाऊस झाल्याने डोंगराचा कमकुवत भाग कोसळला असावा, असे सांगितले जात आहे. ही घटना महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने मात्र गांभीर्याने घेत पुरात्तत्व विभागाने या बाबतचा अहवाल द्यावा, असे म्हटले आहे.
कैलास लेणी पाहण्यास दररोज हजारो पर्यटक येत असतात. त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न असल्याने कोणत्या उपाययोजना करता येतील, याची चाचपणी करण्यासाठी अहवाल मागविण्यात आला आहे. अजूनही हा अहवाल महाराष्ट्र पर्यटन विकास मंडळास मिळाला नाही, असे व्यवस्थापक अण्णासाहेब िशदे यांनी सांगितले.
दक्षिण भागात चर खणून पडणारी दरड थांबवता येऊ शकते काय याची चाचपणी सुरू असली, तरी लेणी भागात काम करणे तसे अत्यंत अवघड काम आहे. यंत्रांच्या कंपामुळे अन्य लेणींवर त्याचे परिणाम होऊ शकतात. विशेषत: १५ क्रमांकाच्या लेणीतून अधिक पाझर होणार नाही, याची काळजी घेणे आवश्यक असल्याने वेरुळ येथील अजिंठा लेणी संवर्धनासाठी कोणती पद्धत वापरली जाईल, याची उत्सुकता आहे. या परिसरातील बांधकामात सिमेंट वापरण्यास मनाई आहे.