सुहास सरदेशमुख, लोकसत्ता

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

औरंगाबाद: ‘खान की बाण’, ‘हिरवा किंवा भगवा’ अशी विभागणी आधी करून घ्यायची. मग त्यात मराठा, ओबीसी असा संघर्ष पेरत राहायचे. मत विभागणीला पोषक पडेल त्या समाजाच्या नावाने रान उठवायचे, असा राजकीय पोत असणाऱ्या औरंगाबाद शहरात राज ठाकरे यांची सभा होण्यापूर्वी ६५ हिंदूबहुल भागात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून निमंत्रणांच्या पत्रिकांवर प्रभू श्रीरामाचे आक्रमक रूप आर्वजून प्रकाशित केले जात आहे.  मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर राज ठाकरे यांची सभा घेण्याचा मानस आहे. या मैदानावरील सभेसाठी येणाऱ्यांच्या संख्येवरून पक्षीय लोकप्रियता मोजण्याची नाहकच प्रथा औरंगाबादमध्ये आहे. सभेला परवानगी मिळण्यासाठी केलेला अर्ज मंजूर होतो की नाही, यावरून  आता चर्चा सुरू झाली आहे. ईदपूर्वी होणाऱ्या या सभेमुळे कायदा व सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होतील का, याची चाचपणी पोलीस करतील. त्यामुळे कोण अधिक आक्रमक हिंदूत्ववादी, अशी शर्यत लागल्यागत वातावरण निर्माण करण्याची तयारी मनसेच्या निमित्ताने सुरू झाली आहे.

शिवजयंतीच्या निमित्ताने शिवसेनेने कार्यकर्त्यांंची बांधणी केली. महापालिकेतील प्रमुख पक्ष आणि आता मुख्यमंत्रीपद शिवसेनेकडे असल्याने शिवसेनेकडून महापालिका निवडणुकीत उमेदवारीसाठी इच्छुकांची संख्या अधिक असणारा त्यामुळे नाराजीतून मनसे व भाजपच्या हाती लागतात काय आणि त्यातून अंतर्गत मतविभागणी कशी होते, यावर औरंगाबाद महापालिकेची गणिते ठरणार आहेत. राजी- नाराजीचा हा खेळ एमआयएम व काँग्रेस- राष्ट्रवादीमध्येही रंगेल. मात्र, तो फारसा असणार नाही. काँग्रेस व राष्ट्रवादीने आपली ताकद वाढविण्यासाठी फारसे काही केले नाही. काही फुटकळ आंदोलने वगळता जिल्ह्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनी हा प्रश्न केवळ आमच्या मुळे सुटला असा केलेला दावाही कोणी गांभीयाने घेत नसल्याचे चित्र दिसून येते.

काँग्रेस व राष्ट्रवादी या दोन्ही पक्षातील नेत्यांनी घेतलेल्या बैठकांमध्ये गटबाजी दिसून येते. त्यामुळे शिवसेनेचे मतदान फोडणे या कामी कोण- कोण उतरेल याची जंत्री भाजपच्या मंडळीकडून केली जात आहे. सेनेतील गटबाजीला मराठा विरुद्ध ओबीसी अशी किनार आता मिळालेली आहे. त्यामुळे या राजकीय पोकळीतील भाषण करताना राज ठाकरे यांच्या निमंत्रणामागे आता रामाचे चित्र लावले जात आहे. रामाचे चित्र, हुनमान चालीसा राजकीय विचाराचा भाग बनल्यामुळे पोलिसांची मात्र डोकेदुखी वाढणार आहे.

हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भाजपने ‘एमआयएम’ला रझाकार म्हणत आक्रमक हिंदूत्वाची धुरा सांभाळली खरी पण औरंगाबाद शहरात एमआयएम विरुद्ध बोलणारे आता तीन पक्ष असतील. त्यात शिवसेना, भाजप व मनसे या तीन पक्षांचा समोवश आहे. प्रचार रणधुमाळीत औरंगाबादकरांचा प्रश्न असेल तो पाण्याचा. रात्री- बेरात्री उठून तीन दिवसाचे पाणी साठविण्यासाठी त्याची धडपड सुरू असताना हिंदूत्वाचा आक्रमतेची शर्यत सुरू झाल्यासारखे वातावरण तयार केले जात आहे. त्यासाठी नेते अयोद्धेला जाण्याची तयारी करत आहेत. श्रीरामच्या चरणी डोके ठेवून जय श्रीरामचा आवाज राजकीय पटलावर वाढवत नेणाऱ्यांमध्ये आता भाजप- सेना व मनसेही उतरली असल्याने वातावरणात मतांचे ध्रुवीकरण व विभाजन गणिते वरच्या पातळीवर ठरवून रणनीती आखली जात आहे. पूर्वी हिंदू जननायक असे राज ठाकरे यांचे फलक औरंगाबादमध्ये लावण्यात आले होते. पण तेव्हा हिंदूत्वावादी भूमिका घेतली आहे काय, या प्रश्नाचे उत्तर राज ठाकरे यांनी दिले नव्हते. आता त्यांनी भगवी शाल ओढलेली असल्याने आक्रमतेत कोण आघाडीवर या चर्चेत नवी भर पडली आहे.

राज ठाकरे यांच्या सभेसाठी मैदान ठरले आहे. ध्वनिक्षेपक व पोलिसांची परवानगी येणे बाकी आहे. ती येण्यापूर्वी प्रत्येक वार्डातून जाहीर सभेची निमंत्रणे देण्यासाठी कार्यकर्ते घरोघरी जाणार आहेत. सभा मोठी होईल हे नक्की.

सुमित खांबेकर, जिल्हाध्यक्ष मनसे

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Lord ram image on mns invitation for raj thackeray s rally in aurangabad zws
First published on: 20-04-2022 at 02:08 IST