औरंगाबाद : औरंगाबाद शहरातील करोना रुग्णसंख्या २.२४ (सकारात्मकता दर)   असून प्राणवायूची निकड असणाऱ्या रुग्णांची संख्या एकूण खाटांच्या संख्येत केवळ २२.१९ एवढी आहे. खाटा रिक्त असण्याचे प्रमाण ७८ टक्के असल्याने हाताचे र्निजतुकीकरण आणि मुखपट्टीचा अनिवार्य वापर आणि अंतर राखून व्यवहार करण्याच्या अटीसह निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. सोमवार सकाळपासून हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शहरातील निर्बंध जवळपास हटविले गेले असले तरी ग्रामीण भागातील रुग्णसंख्येचा दर ५.४६ असून २०.३४ टक्के प्राणवायू खाटांवर रुग्ण आढळून आले आहेत. निर्बंध निकषात ग्रामीण भाग तीन श्रेणीत मोडत असल्याने पाच वाजल्यानंतर ग्रामीण भागात संचारावर निर्बध असून दुकाने सकाळी सात ते चार वाजेपर्यंतच उघडता येणार आहेत. शहरात मात्र नियमित दुकाने उघडता येणार असल्याने व्यापाराला गती मिळण्याची शक्यता आहे. शहरातील मॉल, चित्रपटगृहे आणि नाटय़गृहांनाही नियमित उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. क्रीडांगणे, उद्याने, पहाटे फिरण्यावर व सायकल चालविण्यावर कोणतेही निर्बंध असणार नाहीत. मात्र, मुखपट्टीसह अंतर नियमांचे भान राखण्याची गरज असल्याचे महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले आहे.

राज्य सरकारने निर्बंध शिथिलीकरण कसे केले जावेत याची मार्गदर्शक सूत्रे ठरवून दिल्यानंतर जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिका आयुक्त अस्तिककुमार पांडये आणि पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांच्या उपस्थितीमध्ये बैठक घेण्यात आली. ठरवून दिलेल्या निकषानुसार औरंगाबाद शहर हे श्रेणी एक निकषात बसत असल्याने निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. विवाह आणि अंत्यसंस्कारवरील संख्या मर्यादाही आता ठेवण्यात आलेली नाही.

विषाणू प्रसाराचा वेग कमी झाल्यानंतर निर्बंध शिथिल करावीत अशी मागणी वारंवार केली जात होती. खाटांची उपलब्धता आणि प्रसार या निकषानुसार आता केवळ हात धुणे आणि मुखपट्टी यांसह अंतर नियमाने वागणे एवढीच अट टाकण्यात आली आहे. नियमांनी वागले तर परिस्थिती कायम राहील आणि अर्थकारणलाही वेग येईल असे सांगण्यात येत आहे. आता शहरातील शासकीय कार्यालयेही १०० टक्के उपस्थितीने सुरू राहणार आहेत.

शहरी भागात सार नियमित सुरू, मुखपट्टी अनिवार्य

सर्व दुकाने नियमित उघडी ठेवण्यास परवानी, मॉल, चित्रपट गृहे, रेस्टॉरंट, हॉटेल, खाणावळी, शिवभोजन थाळी, उद्याने, क्रीडांगणे, मोकळ्या जागा, खासगी व सरकारी अस्थापनात शंभर टक्के उपस्थिती, क्रीडा प्रकार, चित्रीकरण, स्नेहसंमेलने, सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम, करमणुकीचे कार्यक्रम, विवाह समारंभ, सभा संमेलन, निवडणुका, आमसभा,  बांधकाम, जीम, सलून, वेलनेस सेंटर, स्पा, सार्वजनिक बस वाहतूक, कार्गो वाहतूक, ट्रेनमध्ये पूर्ण क्षमतेने प्रवास करण्यास मुभा. मात्र, उभे राहून प्रवास करण्यास मनाई असेल. अन्य बाबी नियमित सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.

ग्रामीण भागात सूट पण..

संपूर्ण आठवडय़ामध्ये सायंकाळी पाच वाजेनंतर नागरिकांच्या संचारावर निर्बंध,  सर्व प्रकारची दुकाने सकाळी सात ते दुपारी ४ वाजेपर्यंत चालू ठेवण्यास परवानगी, विवाह समारंभास ५० जणांची तर अंत्यविधीस २० पेक्षा अधिक उपस्थिती असणार नाही. क्रीडांगणे, उद्याने दुपारी चार वाजेपर्यंत उघडण्यास परवानगी,  चित्रपट गृहे पूर्ण बंद, खाणावळी व रेस्टॉरंटमध्ये ५० टक्के आसन क्षमतेवर दुपारी ४ वाजेपर्यंत परवानगी.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Many restrictions relaxed aurangabad city ssh
First published on: 07-06-2021 at 00:57 IST