जाहिरातीमधील मजकुरामुळे कार्यकर्ते चिडले
मराठा क्रांती मोर्चाने उद्या, मंगळवारी येथे आयोजित केलेल्या चक्काजाम आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर एका दैनिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीमुळे आयोजकांत तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे.
मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने ३१ जानेवारी रोजी चक्काजाम आंदोलन करण्याचे ठरवले आहे. हा मोर्चा शांततेत होईल, असा दावा आयोजकांनी केला आहे. मात्र, सोमवारी एका दैनिकात प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीत, आंदोलनाला गालबोट लागण्याची शक्यता असणारा मजकूर प्रसिद्ध झाला. यामुळे मराठा क्रांती मोर्चाच्या आयोजकांमध्ये गोंधळ उडाला. अशी जाहिरात कोणी दिली अशी विचारणा करत काही कार्यकर्ते दैनिकाच्या कार्यालयात घुसले. त्यांनी मिळवलेल्या माहितीनुसार ही जाहिरात पुण्यातील वकिलांने दिल्याचे सांगण्यात आले.
ही व्यक्ती मराठा आरक्षणासंदर्भात दाखल याचिकेमध्ये सरकारी वकील असल्याचेही सांगण्यात आले. केवळ मराठा क्रांती मोर्चाच्या चक्काजाम आंदोलनात दुही पसरावी म्हणून असे कृत्य सरकारकडून केले गेले असल्याचा आरोप आज करण्यात आला.
या अनुषंगाने बाळासाहेब थोरात म्हणाले, की ‘हा चुकीचा प्रचार असून, ज्या वकिलाने ही जाहिरात दिली, त्याच्याकडे एवढी रक्कम कोठून आली, याची चौकशीही करावी.’ मराठा समाजाचे चक्काजाम आंदोलन ठरल्याप्रमाणे होणार असल्याचे विनोद पाटील यांनी सांगितले.