छत्रपती संभाजीनगर : मुलींचा जन्मदर कमी असल्याने आधीच लग्नासाठी मुली मिळण्याची अडचण, त्यात शिक्षण, रोजगार, शेती यांतील कमतरतांमुळे लग्न जुळणेही कठीण. अशा परिस्थितीमुळे मराठवाड्यात गेल्या काही वर्षांत चक्क ‘वधूदक्षिणा’ देऊन मुलांची लग्ने जुळवण्याची पद्धत रूढ होऊ लागली आहे. मात्र, या नवप्रथेचाही गैरफायदा घेणाऱ्यांचे प्रमाण वाढत असून ‘हुंडा’ घेऊन पतीचे घर सोडण्याचे किंवा लग्नाआधीच पैसे घेऊन पोबारा करण्यात आल्याच्या घटना लक्षवेधक ठरत आहेत.
धाराशीवमधील एक तेरा वर्षांची मुलगी आणि तिशीतील तरुण. आंतरजातीय विवाहात अक्षता पडण्यापूर्वीच देण्या-घेण्याचा व्यवहार साडेतीन लाखांमध्ये उरकून घेण्यात आला. मात्र, लग्नाआधीच ही खबर पोलिसांपर्यंत पोहोचली आणि दोन्हीकडची मंडळी बेड्यांत अडकली. अल्पवयीनांच्या लग्नाविरोधात काम करणाऱ्या संस्थेच्या पाहणीत आलेली ही घटना.
दुसरी घटना ऑगस्ट महिन्यातली. सातारा जिल्ह्याच्या कोरेगाव तालुक्यातील ३८ वर्षीय तरुणाचे छत्रपती संभाजीनगरमध्ये लग्न लावून देण्याचे आमिष दाखवण्यात आले. त्याआधारे त्याच्याकडून अडीच लाख उकळण्यात आले आणि मग वाग्दत्त वधू पसार झाली. पीडित तरुणाने पोलीस तक्रारीत नोंदवलेला घटनाक्रम चित्रपटाच्या पटकथेला साजेसा. नवरीच्या मैत्रिणीची आई अंथरुणाला खिळली असल्याने तरुण तिच्या आणि तिच्या मैत्रिणीसह पुण्याला निघाला. वाटेत एक टोळके चारचाकीतून आले आणि नवरदेवावर हल्ला करून नवरी आणि तिच्या मैत्रिणीला घेऊन पसार झाले. या प्रकरणी सिडको पोलिसांनी घटनास्थळी जावून चौकशी केली असता मुलगी दाखवण्यासाठी घरमालकाने तासाभरासाठी तीन हजार रुपये घेतल्याची माहिती समोर आली. अशीच एक घटना खुलताबादजवळ घडली असून, मुलगी फिरायला म्हणून गेली आणि दागिन्यांसह पसार झाली.
बीड जिल्ह्यातील वडवणी येथील एक मजूर तरुणाने मध्यस्थांकरवी जालन्यातील स्थळ नक्की केले. त्यासाठी त्याच्याकडून पावणेदोन लाख रुपये उकळण्यात आले. १० ऑगस्टला लग्नसोहळाही पार पडला. पण आठवडाभरातच मुलीकडची मंडळी नववधूला घेऊन गेली. आता मुलीला सासरी पाठवायला मंडळी तयार नाहीत, म्हणून तरुणाने वडवणी पोलिसांत तक्रार दिली आहे. या घटनेबद्दल बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक वर्षा व्हगाडे यांनी लग्न लावून फसवणूक करणारी टोळी कार्यरत असल्याची शक्यता व्यक्त केली आहे. वडवणीमध्येच अशी श्रीमंत वरस्थळे शोधून त्यांची फसवणूक करणाऱ्या तीन महिलांसह एकाला अटक करण्यात आली. या प्रकरणात आजारी मावशीच्या उपचारासाठी पैसे लागणार असल्याचे सांगून वराकडून तीन लाख रुपये उकळण्यात आल्याचे उघड झाले.
●मराठवाड्यात दर हजार मुलांच्या प्रमाणात मुलींचा जन्मदर ५० ते ८० इतका कमी आहे. गेल्या २० वर्षांत मुलींचा जन्मदर मुलांच्या तुलनेत पुढे गेलेला नाही.
●छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या पाच वर्षांत मुलांच्या तुलनेत मुलींच्या जन्माची वार्षिक संख्या हजार दीड हजारने कमी आहे. २०२४-२५मध्ये ३५१७९ मुले जन्मली तर ३२२९१ मुलींचा जन्म झाला.
●बीडमध्ये मुलींच्या जन्मदरात वाढ होत असली तरी ती अद्याप दर हजार मुलांमागे ९६५ इतकीच आहे. २०११-१२मध्ये हे प्रमाण ७९७ इतकेच होते.
बदनामीच्या भयापायी तक्रार नोंदवली जाणार नाही, अशा मुलांचे कुटुंबीय फसवणूक करणारी टोळी हेरत असल्याचे दिसते. साताऱ्यातील एका तरुणाला लग्नासाठी आणून फसवल्याचा गुन्हा दाखल आहे. – कुंदनकुमार वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी.
मुलींचा जन्मदर ज्या भागात कमी तेथे विवाहेच्छुक तरुणांना फसवण्याचे प्रकार पुढे येत आहेत. परिक्षेत्रातील चार जिल्ह्यांमध्ये काही घटना समोर आल्या आहेत. मुलींमध्येही उच्चशिक्षित जोडीदार मिळत नसल्याने लग्नाविषयी उदासीनता पाहायला मिळते आहे. – वीरेंद्र मिश्र, विशेष पोलीस महानिरीक्षक