आरोपीला शनिवापर्यंत पोलीस कोठडी

औरंगाबाद : ठेवीदारांना रकमा परत केल्याचा बनाव करत ३० लाख ६६ हजार ९६३ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी हडको, एन-११ मधील श्री गणपती अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीचा सचिव डिगंबर परसराम भोसले याला सोमवारी रात्री अटक केली. त्याला शनिवापर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. डी. साळुंके यांनी मंगळवारी दिले.

या प्रकरणात सहकारी संस्थेचे पूरक विशेष लेखा परीक्षक सुधाकर कारभारी गायके यांनी तक्रार दिली होती. तक्रारीनुसार, १२ मार्च २०१८ रोजी गायके यांची हडकोतील श्री गणपती अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटीच्या लेखापरीक्षणासाठी जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्थेने नियुक्ती केली होती. त्यांनी केलेल्या तपासणीत १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०१८ या काळात सोसायटीने अपहार केल्याचे समोर आले. लेखापरीक्षक गायके यांनी किसनराव गणपत भोसले व सौमित्राबाई पांडुरंग साळुंके यांची भेट घेतली. तेव्हा भोसले यांनी ६५ हजार ६०० व साळुंके यांनी ४० हजार १०० रुपयांच्या मुदत ठेवीवर कर्ज घेतले नसल्याचे समोर आले. तसेच सोसायटीने पुरविलेल्या ताळेबंदाप्रमाणे ३१ मार्च २०१८ रोजी १५ लाख सात हजार १७१ एवढी रक्कम हातावर शिल्लक असताना खात्यात कोणतीही रक्कम शिल्लक नसल्याचे दर्शवले. तर नियमबा पद्धतीने गोपनीय खाते उघडून त्यातून साडेसहा लाखांची रक्कम उचलली. त्या रकमेपैकी तीन लाख रुपये सोसायटीने चुकीच्या पद्धतीने गोपनीय खात्यात जमा केले. तसेच पिग्मी खातेदारांच्या खात्यावर रकमा जमा नसताना त्यांना रकमा परत केल्याचे दर्शविण्यात आले होते. तसेच विनातारण पिग्मी कर्जापोटी १३ लाख ३८ हजार ५८७ रुपये आणि विनातारणी कर्मचाऱ्यांना वैयक्तिक कर्ज दिल्याचे दर्शविण्यात येऊन सुमारे ३० लाख ६६ हजार ९६३ रुपयांचा अपहार करण्यात आला. प्रकरणात सोसायटीच्या अध्यक्षासह सचिव, संचालक पिग्मी एजंटांविरुद्ध सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहायक लोकाभियोक्ता अजित अंकुश यांनी संस्थेचे मूळ दस्तावेज जप्त करणे आहे, आरोपी रामदास िशदे व दामोधर थोटे यांचा शोध घेणे आहे, आदींची माहिती मिळवण्यासाठी डिगंबर भोसले याला पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.