संघ म्हणजे प्रेम, जोडत चला, चांगले घेण्यासाठी करा. उदाहरण व आत्मीयता या दोन शब्दांत संघाची कार्यपद्धती दडली आहे. ज्यांनी आपले आयुष्यच संघमय करून संघाला समíपत केले, अशी माणसे संघात प्रत्यक्ष पाहायला मिळतात. देवदुर्लभ कार्यकर्ता हा संघात अनुभवायला मिळतो. सुरेशराव केतकर या शृंखलेतील होते, असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले.
संघाचे ज्येष्ठ प्रचारक व माजी सहसरकार्यवाह सुरेशराव केतकर यांच्या श्रद्धांजली सभेत भागवत बोलत होते. व्यासपीठावर देवगिरी प्रांत संघचालक गंगाधर पवार, लातूर विभाग संघचालक व्यंकटसिंह चौहान, जिल्हा संघचालक संजय अग्रवाल, सुरेशराव केतकर यांचे बंधू डॉ. विलास केतकर उपस्थित होते. भागवत म्हणाले की, सुरेशराव आपल्यात नाहीत हे आपण जाणतो. पण जाणवणारे सुरेशराव जाणीव असेपर्यंत आपल्यासोबत राहतील. ५-१० मिनिटे त्यांची ज्यांच्याशी भेट झाली, त्यांच्या जीवनावर सुरेशरावांनी कायमची छाप पाडली. सुरेशरावांसारखी माणसे जाण्यासाठी आलेलीच नसतात, केवळ त्यांचे रूप दृष्टीआड होते. त्यांच्या कृतीतून अशी अनेक दृष्टीआड रूपे वेळोवेळी प्रकट होतात. ते विचाराने कर्मठ, कर्तव्यकठोर होते. त्यांच्याकडे पाहिल्यानंतर समोरच्याला आपोआपच त्यांचा धाक वाटत असे. एरवी हरवून जात असलेले नियम कडक पाळणारे म्हणजे सुरेशराव. त्यांनी जीवनात उत्कृष्टतेचा ध्यास घेतला होता. हाती घेतलेले कोणतेही काम उत्कृष्टच व्हायला हवे या जिद्दीने ते शेवटपर्यंत जगले. ‘आधी केले मग सांगितले’ म्हणजे काय हे सुरेशरावांकडे पाहून अनेकांनी अनुभवले. वयाच्या ५५ व्या वर्षी त्यांच्यावर अखिल भारतीय शारीरिक शिक्षणप्रमुख ही जबाबदारी आली.
एका शिबिरात १५ किलोमीटर मॅरेथॉन स्पध्रेचे आयोजन केले होते. त्यावेळी सुरेशरावांनी १५ किलोमीटर स्वत सहभाग दिला. कुठलीही विश्रांती न घेता ते आपल्या दिनक्रमात व्यस्त राहिले. संघाचा अखिल भारतीय शारीरिक शिक्षणप्रमुख म्हणून जबाबदारी आल्यानंतर मला १५ किलोमीटर पळणे शक्य नाही असे सांगितले तर उपयोग काय? आपल्या जबाबदारीला अनुरूप आपले वागणे असले पाहिजे यावर त्यांचा कटाक्ष होता. अनेक विषयांचा त्यांचा अभ्यास होता. मात्र, कधीही विनातयारी बोलण्यास उभे राहिले नाहीत. केरळात एक महिन्याचा प्रवास होता तेव्हा त्यापूर्वी इंग्रजीतून बोलण्याचा त्यांनी सराव केला होता.
अनेक कार्यकर्त्यांना त्यांनी जीव लावला. मात्र, कोणी कुठे चुकत असेल तर त्याची त्याला योग्य वेळी न दुखवता जाणीव करून देण्यात ते कमी पडले नाहीत. डॉ. हेडगेवारांनी १९२५ मध्ये संघाचे बीज रोवले त्याचा आज केतकरांसारख्या देवदुर्लभ कार्यकर्त्यांच्या समर्पणातूनच वटवृक्ष उभा राहिला आहे. आपल्यावर जी जबाबदारी आहे ती पार पाडण्यासाठी केतकर जसे आयुष्यभर जगले त्या पद्धतीने आयुष्य व्यतित करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, याची जाणीव स्वयंसेवकांनी ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.
व्यंकटसिंह चौहान यांनी प्रास्ताविक केले. पूजा केतकर, उदय लातुरे, विनोद खरे, देवगिरी प्रांताचे कार्यवाह हरीष कुलकर्णी व किसान संघाचे दिनेश कुलकर्णी यांनी केतकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. तेजस्विनी अयाचित यांनी ‘दीपक तू हरदम जलता जा’ हे पद्य सादर केले. कुलदीप धुमाळे यांनी सूत्रसंचालन केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mohan bhagwat pay tributes to veteran rss campaigner sureshrao ketkar
First published on: 25-07-2016 at 01:12 IST