वर्षभरापूर्वी सत्तेत आलेले सरकार आपली प्रतिमा जपण्यातच मश्गूल असून राज्यात काय चालले आहे, त्यांनाही कळायला मार्ग नाही. शेतकऱ्यांना उत्पादन खर्चावर आधारित भाव देऊन शाश्वत सिंचन योजना राबवली तरच आत्महत्या थांबतील. या बाबत सरकारशी आम्ही सातत्याने बोलत असलो, तरी ते लक्षात घेत नसल्याने सरकारच्या कामावर आपण असमाधानी असल्याचा घरचा आहेर सत्ताधारी महायुतीतील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी दिला. ऊसतोड मजुरांच्या मागण्या रास्त असून कोयता बंद आंदोलनाला आपला पािठबा असल्याचे सांगत सरकार चुकत असेल तर विरोधात जायला घाबरणार नाही, अशी पुस्तीही शेट्टी यांनी जोडली.
खासदार शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष रविकांत तुपकर यांनी येथे सोमवारी जिल्ह्यातील दुष्काळी स्थितीचा आढावा घेतल्यावर पत्रकार बठक घेतली. मराठवाडय़ात दुष्काळाची तीव्रता अधिक असल्याने खरीपपाठोपाठ रब्बी हंगामही अडचणीत आला आहे. भविष्यात जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनेल. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत चांगली कामे झाली असली, तरी पाऊस न पडल्याने याचा उपयोग झाला नाही. दुष्काळात शेतकऱ्यांच्या मालास योग्य भाव मिळत नाही. मका, सोयाबीन हमीभावापेक्षा कमी दराने खरेदी केला जात आहे. शासकीय खरेदी केंद्रे सुरू करणे सरकारची जबाबदारी असतानाही ती सुरू नाहीत. कापसालाही योग्य भाव दिला जात नसल्याने शेतकरी पूर्णपणे कोलमडून पडला आहे, याकडे शेट्टी यांनी लक्ष वेधले.
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात जालना जिल्ह्यातील राजूर गणपती येथे कापूस, सोयाबीन परिषद घेणार आहे. शेतकरी आत्महत्येचा प्रश्न गंभीर असून तात्पुरत्या मदतीने काही होणार नाही. या साठी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांचे शिक्षण अर्धवट राहू नये, म्हणून त्यांना दत्तक घेण्याची योजना स्वाभिमानी शेतकरी संघटना राबवत आहे. शेतीवर अवलंबून कुटुंबांचे सर्वेक्षण करून त्यांच्यासाठी पथदर्शी प्रकल्प राबवणार असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले. मदत ही तात्पुरती उपाययोजना असून मानसिक आधार, आध्यात्मिक प्रबोधन केल्याने आत्महत्या थांबणार नाहीत. त्या थांबविण्यासाठी १० वर्षांपूर्वी टाटा इन्स्टिटय़ूटने दिलेल्या हमीभावाच्या अहवालाची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. शेतकऱ्याची आत्महत्या ही शेतकरी चळवळीवरील अविश्वास असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. सरकारच्या धोरणाविषयी असमाधान व्यक्त करून शेट्टी म्हणाले, ऑक्टोबरमध्ये दुष्काळ जाहीर करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या संदर्भात उपाययोजना करण्यासाठी सरकारला थोडा वेळ दिला पाहिजे. सध्या सरकारची तिजोरी रिकामी आहे. सरकार निर्णय घेताना चुकल्यास विरोध करायला घाबरणार नाही. ऊसतोड कामगारांच्या मागण्या योग्य आहेत. त्यांच्या संपाला पािठबा असल्याचे खासदार शेट्टी यांनी सांगून सरकार प्रतिमा जपण्यात अडकले असल्याचा घरचा आहेर त्यांनी दिला.
संग्रहित लेख, दिनांक 20th Oct 2015 रोजी प्रकाशित
‘सरकारच्या धोरणावर असमाधानी, सरकार प्रतिमा जपण्यातच मश्गूल’ -राजू शेट्टी
वर्षभरापूर्वी सत्तेत आलेले सरकार आपली प्रतिमा जपण्यातच मश्गूल असून राज्यात काय चालले आहे, त्यांनाही कळायला मार्ग नाही.
Written by बबन मिंडे
Updated:
First published on: 20-10-2015 at 01:10 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No satisfy on concisely of government