ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपा नेत्या पंकजा मुंडेंनी ठाकरे सरकारला इशारा दिला आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लावण्याचा विचारही केल्यास ओबीसी लोक तुम्हाला राज्यात कुठेही रस्त्यावर फिरू देणार नाहीत, असं त्यांनी औरंगाबादच्या ओबीसी मेळाव्यात म्हटलंय. “आधीच उपाशी आणि त्यातून उपवास अशी गत बहुजनांची झाली आहे”, असं म्हणत भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनी खंत व्यक्त केली. तसेच, “गावांमध्ये अजुनही जातीच्या भिंती संपुष्टात आलेल्या नाही. आज या महाराष्ट्रात ओबीसींची, बहुजनांची अशी परवड का?” असा सवाल देखील त्यांनी महाविकासआघाडी सरकारला केला आहे. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आता निवडणुका येणार आहेत, लोकांमध्ये नाराजी आहे, संताप आहे. लोक रस्त्यावर उतरत आहेत. भाजपाच नाही ओबीसी समाज देखील रस्त्यावर उतरलेला आहे. मग अशावेळी त्यांनी अध्यादेश काढण्याचा निर्णय घेतला. हा अध्यादेश अगोदर काढला असता तर, या ज्या निवडणुका आता लागल्या आहेत, त्यांना तो लागू झाला असता की नाही? या अध्यादेशावरून ओबीसीला कुठला धोका देण्याचं जर तुमचं षडयंत्र असेल तर ओबीसी तुम्हाला रस्त्यावर फिरू देणार नाही. वंचितांना, पिडीतांना, सामान्य माणसाला न्याय मिळावा यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आरक्षण दिलं आहे. ४२ वर्षांपासून आरक्षणासाठी लढा सुरू आहे. अजुनही समाजाला न्याय मिळत नाही, हे दुर्दैवाची गोष्ट आहे. आता बहुजनांची व्याख्या खराब करण्याचं षडयंत्र सुरू झालं आहे,” असा आरोप पंकजा मुंडे यांनी यावेळी केला.

“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तर १० टक्के आरक्षण दिलेलं आहे. ज्यांची आर्थिक क्षमता नाही त्यांच्यासाठी हे आरक्षण दिलं आहे. या देशामध्ये अनेक राज्ये आहेत ज्यांनी आपल्या राज्याच्या मंत्रिमंडळात, विधासभेत निर्णय घेतले आहेत व बहुजनांना न्याय दिलेला आहे. आज आपल्या राज्यात मी मंत्री होते तेव्हा, त्यावेळी ओबीसींचं ५० टक्के झालेले आरक्षण धोक्यात होतं, पण हे सरकार आल्यानंतर ५० टक्क्यांच्या खालचं सुद्धा आरक्षण संपुष्टात आलं आहे. ही अत्यंत लाजीरवाणी गोष्ट आहे.” असंही पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pankaja munde attacks on mva government in aurangabad over obc reservation hrc
First published on: 13-10-2021 at 10:31 IST