छत्रपती संभाजीनगर : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या बीड जिल्हा दौऱ्यादिवशीच परळी बंदची हाक देण्यात आली आहे. गुंडगिरीच्या निषेधार्थ सोमवारी म्हणजे नेमक्या आठवडी बाजारादिवशीच परळी बंदचे आवाहन करण्यात आले आहे.परळीत पुन्हा एकदा गुंडगिरीचा प्रकार उघडकीस आला आहे. शिवराज दिवटे (वय १८) या तरुणाला शुक्रवारी उचलून रत्नेश्वर डोंगराच्या पायथ्याशी नेऊन, ‘तुझा संतोष देशमुख करतो’ म्हणत अत्यंत अमानुषपणे मारहाण करण्यात आली.

त्याची चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाली. याची नोंद घेत बीडचे पोलीस अधीक्षक नवनीत काॅवत यांनी तत्काळ गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्याचा आदेश दिला. याप्रकरणी पोलीस अधीक्षक काॅवत यांनीच दिलेल्या माहितीनुसार मारहाण झालेला तरुण शिवराज दिवटे हा लिंबोटा गावचा आहे. त्याच्या फिर्यादीवरून संभाजीनगर पोलीस ठाण्यात दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केलेला असून, सात जणांना ताब्यात घेतले आहे. त्यातील दोन विधिसंघर्षग्रस्त बालके आहेत. सचिन विष्णू मुंडे, ऋषिकेश ज्ञानोबा गिरी, रोहन उमेश वाघुळकर, समाधान श्रीकृष्ण मुंडे व आदित्य बाबासाहेब गिते अशी उर्वरित आरोपींची नावे आहेत.

दरम्यान, स्वत: शिवराज दिवटे याने मारहाणीच्या घटनेबाबत सांगितले, की आपण एका मित्रासोबत परळीतील जलालपूर भागात एका धार्मिक कार्यक्रमासाठी गेलाे होताे. तेथे काही लोकांमध्ये वाद झाला. ते पाहून नंतर शुक्रवारी दुपारी ३.३० च्या सुमारास गावाकडे निघालाे. रिलायन्स पेट्रोलपंपाजवळ टाेळके आधीच येऊन उभे होते. त्यांनी आपली दुचाकी अडवून उचलून नेत रत्नेश्वर डोंगराजवळ मारहाण केली. मारहाण करणारे गांजाच्या नशेत होते आणि ‘याला सोडू नका, याचा संतोष देशमुख करू’, असे म्हणून कत्ती, लोखंडी राॅड, बांबूने मारहाण केली. दारूची बाटलीही डोक्यात घातली. नजीकच्या दोन व्यक्ती मदतीसाठी धावून आल्या. त्यांनी मारहाण करणाऱ्यांना पिटाळून लावले.

संतोष देशमुख करायचा म्हणून शिवराज दिवटेला मारहाण करण्यात आली. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तरुणांना मोक्का लावण्यात यावा. कायद्याची जरब बसवावी. याप्रकरणी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलीस अधीक्षकांची भेट घेणार आहोत. पोलिसांचा काही भागात वचकच राहिला नाही.राजेसाहेब देशमुख, नेते, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)

शिवराज दिवटे हल्लाप्रकरणी दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. सात जणांना ताब्यात घेतले आहे. यातील दोन जण विधिसंघर्षग्रस्त बालके आहेत. या प्रकरणाला जातीय रंग देण्याचा प्रयत्न होत आहे. परंतु आरोपी हे मराठा, वंजारी, बौद्ध, गोसावी व माळी समाजाचे आहेत. यातून कोणत्याही जातीतील संघर्ष स्पष्ट होत नाही. त्यामुळे जातीय रंग देऊ नये.नवनीत काॅवत, पोलीस अधीक्षक

उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री हे सोमवारी जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात त्यांच्यासमोर संघटनात्मक पातळीवरील काही कामकाज मांडले जाणार आहे. सध्या पक्षाची सदस्य नोंदणी सुरू आहे.राजेश्वर चव्हाण, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार)

परळीत सोमवारी आठवडे बाजार असला, तरी आम्ही व्यापाऱ्यांना व्यवहार बंद ठेवण्याबाबत आवाहन करणार आहोत. कारण एक दिवस त्रास झाला, तरी गुंडगिरी वर्षानुवर्षे सहन करावी लागत आहे.गुंडगिरीच्या निषेधार्थ आणि आरोपींची धिंड काढण्याच्या मागणीसाठी बंदची हाक दिली आहे. देवराव लुगडे महाराज, तालुकाध्यक्ष, परळी, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)