लातूरच्या पाणीटंचाईची चर्चा सर्वत्र असली, तरी टंचाईतच येथे राबवण्यात येणारे उपक्रमही दिशादर्शक ठरत आहेत. जलसेवा ग्रुपच्या वतीने अवघ्या १० रुपयांत एटीएमच्या माध्यमातून २० लीटर शुद्ध पाणी वितरण करण्याचा उपक्रम सुरू केला आहे.
भाजप शहर जिल्हाध्यक्ष शैलेश लाहोटी, काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष मोईज शेख, अष्टविनायक प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रदीप राठी, राष्ट्रवादीचे शहर विधानसभा अध्यक्ष शैलेश स्वामी यांच्या उपस्थितीत या उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. शहराला डिसेंबरपासून पाणीटंचाई जाणवू लागली आहे. गत महिन्यापासून टंचाईच्या झळा अधिकच तीव्रतेने जाणवू लागल्या आहेत. लातूरकरांना पाण्यासाठी दाहीदिशा भटकंती करावी लागत आहे. गरज भागवण्यासाटी बहुतांश नागरिक पाणी विकत घेत आहेत, मात्र हे पाणी शुद्ध असेल की नाही याची शाश्वती नसल्यामुळे आगामी काळात शहरात साथीचे रोग पसरण्याचा धोका उद्भवू शकतो. ही बाब लक्षात घेऊनच शहरातील जलसेवा ग्रुपचे शैलेश स्वामी, सिद्धेश्वर गुणगुणे, नागेश कानडे, मनोज इंगळे, प्रा. डॉ. जितेश स्वामी, राहुल महाजन, राजकुमार वडजे यांनी हा उपक्रम राबवण्याचे ठरविले.
टंचाई लक्षात घेऊन पाण्याची बचत व्हावी, शुद्ध पाणी मिळावे या हेतूने एटीएमच्या माध्यमातून पाणी वितरण करण्याची कल्पना पुढे आली. त्यानंतर या सात जणांनी येथील औसा हनुमान मंदिराजवळ पाणी शुद्धीकरण प्रकल्प सुरू केला. या माध्यमातून अवघ्या १० रुपयांत २० लीटर शुद्ध पाणी देण्यासाठी एटीएमसारखी मशीन बसवण्यात आली. यातून उपलब्ध होणारे पाणी शुद्ध असल्यामुळे नागरिकही यास चांगला प्रतिसाद देत आहेत. आगामी काळात पाणी उपलब्ध झाल्यास याचा दर पाच रुपये करण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला. आगामी काळात यासारखे प्रकल्प शहरात सर्वत्र सुरू व्हावेत या दृष्टीने प्रयत्न असून या करिता सामाजिक संस्थांनीही पुढाकार घ्यावा, असे आवाहन जलसेवा ग्रुपच्या वतीने करण्यात आले. या उद्घाटनप्रसंगी अष्टविनायक प्रतिष्ठानच्या वतीने दररोज एक टँकर मोफत पाणी या प्रकल्पाला देण्याचे प्रदीप राठी यांनी जाहीर केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
More Stories onलातूरLatur
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pure water distribution in atm machine
First published on: 17-03-2016 at 01:20 IST