छत्रपती संभाजीनगर : गेल्या काही दिवसांपासून सुरू असणाऱ्या पावसामुळे वेरुळमधील ३२ क्रमांकाच्या लेणीत गळती होऊ लागली आहे. गेल्या वर्षीही हा प्रकार दिसून आल्यानंतर भारतीय पुरातत्त्व विभागाच्या वरिष्ठ कार्यालयास कळविण्यात आले होते. वेरुळमधील याच लेणीमध्ये ऐतिहासिक चित्र असल्याने लेणीच्या दुरुस्तीसाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
गेल्या आठवड्यात झालेल्या जोरदार पावसामुळे वेरुळ लेणीतील धबधबाही सुरू झाला होता. लेणीच्या वरच्या डोंगरावरून येणाऱ्या पाण्यामुळे लेणीचे छत गळू लागले आहे. खरे तर डोंगर कपारीमधील भेगा बुजविण्यासाठी सातत्याने काम करण्याची आवश्यकता आहे. या गळतीबाबतची माहिती वरिष्ठ कार्यालयास कळविली असल्याचे भारतीय पुरातत्व विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान या प्रश्नावर गांभीर्याने उपाययोजना करण्यासाठी प्रस्ताव सादर करावेत, अशी मागणी केली जात आहे.