फडणवीस सरकार शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्याच्या मनस्थितीत नाही. शेतकरी ५० हजारांसाठी गळफास घेत आहेत. त्यामुळे आता शांत न बसता कर्जाच्या बेडय़ा आपल्याच हाताने सोडविण्याचा मार्ग शोधला पाहिजे. येणाऱ्या काळात शेतकऱ्यांनी कर्जमुक्ती अभियानात सक्रिय होऊन लढता लढता मरावे, असे आवाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष खासदार राजू शेट्टी यांनी केले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शेतकरी कर्जमुक्ती अभियानाचा प्रारंभ तुळजापुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात जाहीर सभेने करण्यात आला. खासदार शेट्टी व प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी तुळजाभवानीची पूजा करून देवीला साकडे घातले. शेतकऱ्यांसमोर बोलताना केंद्र व राज्य सरकारवर शेट्टी यांनी जोरदार टीका केली.

गेल्या ४ वर्षांपासून दुष्काळाने खचलेल्या शेतकऱ्यांना या सरकारकडून मोठय़ा अपेक्षा होत्या. मात्र, सर्वच अपेक्षा पायदळी तुडविल्या आहेत. दररोज होणाऱ्या शेतकरी आत्महत्येने देश सुन्न झाला आहे. राज्यकर्त्यांचे दुर्लक्ष कमालीचे संतापजनक आहे, मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडून आता कोणत्याही अपेक्षा राहिल्या नसून, यापुढे शेतकरीच विधानसभा व लोकसभेत गेले पाहिजेत. त्याशिवाय न्याय मिळणार नाही, असे खासदार शेट्टी म्हणाले.

शेतकऱ्यांच्या नावावर इतरांनी काढलेले कर्ज शेतकऱ्यांना बदनाम करणारे आहे. उद्योगपतींना सवलती देता, तसेच १२१ हजार कोटी रुपये थकबाकी असताना त्यांना मोकळे सोडून शेतकऱ्यांच्या मात्र जप्त्या करता. केवळ ५० हजारांसाठी गरीब शेतकरी आत्महत्या करीत आहे, ही बाब सरकार व समाजासाठी शरमेची आहे. आगामी काळात देशभरात शेतकरी आंदोलन देशभर करून शेतकऱ्यांचेच प्रतिनिधी लोकसभा व विधानसभेत पाठवावे लागतील, असे त्यांनी सांगितले.

स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष खोत यांनी या वेळी राज्य सरकारचा समाचार घेतला. शेतकऱ्यांची जप्ती होत असल्यास अधिकारी वर्गाला झोडपून काढा. पुन्हा त्याने गावात आले नाही पाहिजे, अशी सोय करा, सहकारी बँका व साखर कारखाने उद्ध्वस्त करणाऱ्यांवर कारवाई करा, असे ते म्हणाले.