केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा सल्ला

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सत्तेमध्ये राहून विरोधकासारखे वागू नये, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मंगळवारी औरंगाबादमध्ये एका पत्रकार परिषदेत दिला. कर्जमाफीसाठी लागणारी रक्कम कोठून उभी करायची, हेदेखील त्यांनी सांगायला हवे, असे म्हणत रामदास आठवले यांनी भाजपची बाजू घेतली, मात्र शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावर भाजप योग्य की शिवसेना या प्रश्नाचे उत्तर देण्याचे त्यांनी टाळले. दोघांचेही बरोबरच, असे ते हसत हसत म्हणाले.

शिवसेनेने शेतकरी कर्जमाफीच्या प्रश्नावरून सरकारमधून बाहेर पडू नये, असे आपल्याला वाटते. त्यांनी सरकारमध्ये असल्यासारखे वागावे. नुकतेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीस हजेरी लावण्यास आलेल्या उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधानांना पुष्पगुच्छ दिला. त्यांच्या कामाची वाहवा केल्याची आठवणही आठवले यांनी सांगितली. भाजप-सेनेने एकत्र राहावे असे आपल्याला वाटते, असे सांगत उद्धव ठाकरे हे मित्र आहेत त्यांची भेट घेणार असल्याचेही ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे तोंडभरून कौतुक करत आठवले यांनी पंचतीर्थ योजना, मुद्रा कर्ज, स्टार्टअप योजनेमध्ये दलित तरुणांना उद्योजक होण्यासाठी केलेल्या २०० कोटी रुपयांच्या तरतुदीचा उल्लेख करत भाजप शासन आरक्षण काढून घेणारे नसल्याचा दावा केला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत आणि मनमोहन वैद्य यांच्या वक्तव्यामुळे काही संभ्रम निर्माण झाले होते, मात्र संघाने घटनेने दिलेले आरक्षण कायम राहावे, असे प्रसिद्धिपत्रक काढल्याचे सांगत भाजप सरकार आरक्षण रद्द करण्याचा कोणताही विचार करत नसल्याचे सांगितले.

माझे मंत्रिपद आणि दलित ऐक्य

नेहमीप्रमाणे दलित ऐक्याचा प्रश्न आला आणि रामदास आठवले म्हणाले, मला काही ऐक्याचे अध्यक्षपद नको आहे. ऐक्यासाठी सर्वानी मिळून निर्णय घ्यावा आणि तो एकमताने जाहीर करावा. जे नेते ऐक्यामध्ये सहभागी होणार नाहीत त्यांना कार्यकर्त्यांनी जिल्हा बंदी करायला हवी. कार्यकर्त्यांनीच आता ऐक्यासाठी नेत्यांवर दबाव आणावा, मात्र असे करताना माझ्या मंत्रिपदाला काही धक्का लागू नये, असे ते म्हणाले आणि पत्रकार बैठकीमध्ये हशा पिकला.

आरक्षण ७५ टक्क्यांपर्यंत वाढवा

नव्याने काही जातींना आरक्षण देण्यासाठी २५ टक्के आरक्षणाची मर्यादा वाढवून ती ७५ टक्के केली जावी, त्यासाठी नवीन दुरुस्ती केली जावी, तरच मराठा जातीसह अन्य जातसमूहांना आरक्षण देणे शक्य होईल, अशी भूमिका राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीमध्ये मांडल्याचे आठवले म्हणाले.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ramdas athawale comment on uddhav thackeray
First published on: 24-05-2017 at 02:23 IST