scorecardresearch

परभणीच्या बाजारात कापसाला भाव, पण शेतकऱ्यांकडे अभाव!

या हंगामात सुरू असलेली कापसाची आबाळ थांबण्याची चिन्हे असून सोमवारी परभणीच्या बाजारात कापसाने चक्क साडेचार हजार रुपयांचा टप्पा ओलांडला. परभणी बाजार समितीअंतर्गत झालेल्या कापूस खरेदीने ४ हजार ५३० ते ४ हजार ६४० रुपये भाव गाठला.

या हंगामात सुरू असलेली कापसाची आबाळ थांबण्याची चिन्हे असून सोमवारी परभणीच्या बाजारात कापसाने चक्क साडेचार हजार रुपयांचा टप्पा ओलांडला. परभणी बाजार समितीअंतर्गत झालेल्या कापूस खरेदीने ४ हजार ५३० ते ४ हजार ६४० रुपये भाव गाठला. अर्थात, कापसाचे भाव वाढत असले, तरीही उत्पादन मात्र कमालीचे घटले असल्याने या दरवाढीचा कोणताही फायदा शेतकऱ्यांना होण्याची चिन्हे नाहीत.
या वर्षी परभणी बाजारपेठेत २९ ऑक्टोबरपासून कापूस खरेदीला प्रारंभ झाला. सुरुवातीला ४ हजार १५५ रुपये क्विंटल असा दर होता. ४ हजार १०० ते ४ हजार २०० रुपयांदरम्यान कापसाच्या भावात चढ-उतार होत राहिले. गेल्या काही दिवसांपासून कापसाने हळूहळू उसळी मारली. कापसाला सोमवारी परभणी बाजारात यंदा हंगामातील उच्चांकी दर होता. देशभरात कापसाचे उत्पादन घटत चालल्याने आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही कापसाच्या भावात वाढ होताना दिसत आहे. भारत हा कापूसउत्पादक देशांमधील महत्त्वाचा देश मानला जातो. दरवर्षी भारतात कापसाचे ४ कोटी गठाण उत्पादन होते. १६५ ते १७० किलो रुई म्हणजेच एक गठाण असे माप आहे. या वर्षी किमान २५ टक्क्यांनी कापसाचे उत्पादन घटणार, असा प्राथमिक अंदाज आहे. अर्थात, ही घट आणखीही जास्त असल्याची शक्यता आहे.
देशभरातच कापूसउत्पादन कमी झाल्याने रुईचे आणि सरकीचेही भाव वाढले. कर्नाटक, महाराष्ट्रात कमी पाऊस झाल्याने कापूस उत्पादन घटले, तर पंजाब, हरियाणा प्रांतांत पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव झाल्याने कापसाचे पीक संकटात आले. अशा स्थितीत उत्पादनच घटल्याने कापसाच्या दरात मोठय़ा प्रमाणात वाढ होताना दिसून येत आहे.
कापसाने साडेचार हजारांच्या पुढचा टप्पा ओलांडला असला, तरीही कापसाचे उत्पादन मात्र कमालीचे घटले आहे. परभणीच्या बाजार समितीच्या आवारात केवळ ९० हजार क्विंटल कापसाची खरेदी आतापर्यंत झाली. गेल्या वर्षीही कापसाचे उत्पादन कमीच होते. खरेदी मात्र उशिरा सुरू झाली. या वर्षी परभणीत कापसाची खरेदी २६ ऑक्टोबरला होऊनही ९० हजार क्विंटल कापूसच बाजारात आला, तर गतवर्षी १५ नोव्हेंबरला खरेदी सुरू होऊनही एक लाखाच्याही पुढे खरेदीचा आकडा गेला. परभणी कापूस उत्पादनात सदैव अग्रेसर असलेला जिल्हा आहे. २०१२ ते १३ दरम्यान कापसाचे उत्पादन तब्बल ६ लाख २३ क्विंटल झाले. त्या तुलनेत परभणीतील कापसाची खरेदी ही २५ टक्केही नाही.
कापसाचे भाव वाढत असताना शेतकऱ्यांकडे मात्र कापूस नाही, अशी स्थिती आहे. सध्या कापसाचे भाव वाढलेलेच राहतील. या भावात घट होणार नाही. मकरसंक्रांतीनंतर मात्र कापसाचे दर कमी होऊ शकतात, असे मत कापूस खरेदीदार संघटनेचे अध्यक्ष पद्माकर कंदी यांनी व्यक्त केले. गेल्या दोन दिवसांत कापसाच्या भावात ही वाढ झाली, तरीही परभणीच्या बाजारपेठेत येणारा कापूस मात्र कमीच आहे. यंदा उत्पादनच घटल्याने नेहमीप्रमाणे कापसाची आवक नाही, असे मत परभणी बाजार समितीचे सचिव सुरेश तळणीकर यांनी व्यक्त केले.

मराठीतील सर्व औरंगाबाद ( Aurangabad ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Rate of cotton