लोकसत्ता प्रतिनिधी

छत्रपती संभाजीनगर : स्टॉक एक्सचेंज कंपनीत गुंतवणूक केल्यास अधिकचा परतावा देण्याचे आमिष दाखवून एका निवृत्त शिक्षकासह त्यांच्या मुलाची मिळून तीस लाख रुपयांची फसवणूक केली. अन्य काही जणांनाही अशाच प्रकारे आमिष दाखवून कोट्यवधींना फसवल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला आरोपी राहुल राजेंद्र काबरा याचा अटकपूर्व जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्या. एस. एस. गोरवाडे यांनी नामंजूर केला.

या प्रकरणात देवळाई परिसरातील निवृत्त शिक्षक हेमंत रंगनाथ जगताप (वय ७३) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार, मार्च २०१० मध्ये जगताप हे सेवानिवृत्त झाले. त्यांचा नातेवाईक अनिल तांगडे याने त्यांना सांगितले की, राहुल काबरा हा झीरोढा या स्टॉक एक्सचेंज कंपनीशी निगडीत योजनेमध्ये व इतर व्यवसायांमध्ये गुंतवणूक करतो. त्याच्याकडे गुंतवणूक केल्यास तो गुंतवणूकीच्या रक्कमेवर चांगला परतावा देतो. या योजनेमध्ये १०-१५ लोकांनी गुंतवणूक केल्यास त्या रक्कमेवर २ ते ६ टक्क्यांपर्यंत परतावा मिळतो, असे सांगितले. या आमिषाला बळी पडून जगताप यांनी १० लाख रुपयांची गुंतवणूक केली.

गुंतवणूक केलेल्या रक्कमेवर जुलै २०२३ पर्यंत परतावा दिला. त्यानंतर मात्र परतावा देणे बंद केले. काबरा याने अशाच प्रकारे जगताप यांच्यासह त्यांच्या मुलालाही २० लाख रुपयांना तर इतर १० ते २० लोकांना एक ते दोन कोटी रुपयांचा गंडा घातल्याचेही फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राहुल काबरा याने अटक होऊ नये यासाठी अर्ज दाखल केला. सहायक लोकाभियोक्ता राजू पहाडीया यांनी आरोपीने अनेकांना गंडा घातल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. न्यायालयाने आरोपीचा जामीन अर्ज नामंजूर केला.