छत्रपती संभाजीनगर : दुचाकीवरून प्रवासी वाहतुकीस परवानगी नसताना ती केल्याने जाहीर सुनावणाऱ्या परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या गाेविंदा पथकाच्या स्पर्धेसाठी ‘रॅपिडो’ कंपनीने १० कोटींचे प्रायोजकत्व दिले. अशा प्रकारे आधी धमकी देऊन नंतर प्रयोजकत्व मिळविणे अनैतिक आहे. याचे उत्तर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सरकारकडून मिळावे, अशी मागणी रोहित पवार यांनी केली.
दुचाकी टॅक्सी क्षेत्रात काम करणाऱ्या रॅपिडो कंपनीने मुंबईत सुरू केलेल्या सेवेमुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक कसे वैतागले होते, याचे चलचित्रण उपलब्ध होते. आता तीच कंपनी ठाण्यातील गोविंदा पथकाच्या स्पर्धांसाठी प्रायोजक म्हणून कसे पुढे येते ? यामध्ये किमान १० कोटी रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती आपल्याकडे आहे. अशा प्रकारे स्पर्धा करण्याला विरोध नाही. पण ज्या प्रकारे प्रायोजकत्व मिळाले आहे, ते नैतिक नाही.
पक्ष फुटीनंतर बाहेर पडलेल्या मतदारसंघात पुनर्निवडणूक
उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वारंवार दिल्ली किंवा त्यांच्या गावी जाणे हे महायुतीमध्ये आलबेल नाही, याचेच एक दर्शक आहे. चिन्हासाठी सुरू असणाऱ्या राजकीय लढ्यात धनुष्यबाण हे चिन्ह उद्धव ठाकरे यांना मिळेल, अशी चर्चा सुरू झाली आहे. तसे झाले तर घड्याळ हे चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेस ( शरद पवार ) पक्षास मिळेल. असे झाल्यास फुटून बाहेर पडणाऱ्या पक्षातील नेत्यांना भाजपमध्ये विलीन व्हावे लागेल. तसे न झाल्यास महाराष्ट्रातील ९३ मतदारसंघात पुनर्निवडणुका घ्याव्या लागतील, अशी मांडणीही रोहित पवार यांनी केली. हे सारे तर्क की, अंतर्गत गोटातील माहिती याविषयी बोलताना ते म्हणाले, तर्क आणि माहितीचा संगम राजकारणात करावा लागतो. त्या आघाडीवर आमचे बरे चालले आहे.’
दरम्यान, शेतकरी आणि बेरोजगारी या दोन्ही आघाड्यांवर पुढील काळात रस्त्यावरचा लढाही आम्ही उभारू, असेही पवार म्हणाले. या वेळी प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनीही पक्ष सोडून जाणाऱ्यांकडे नाही तर पक्षात राहणाऱ्यांकडे लक्ष देणार असल्याचे सांगितले. या वेळी माजी आमदार राजेश टोपे यांची उपस्थिती होती.