शरद पवार यांच्याकडून पगारवाढीचे समर्थन; संपर्कासाठी मोठा खर्च
राज्यातील आमदारांच्या पगारवाढीवर समाजमाध्यमातून जोरदार टीका होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मात्र आमदारांच्या पगारवाढीचे समर्थन केले आहे.
मुंबईसारख्या ठिकाणी राहणे, तेथील नोकरचाकर, कार्यकत्रे तसेच आमदार महोदयांच्या मतदारसंघातील जनतेशी संवाद साधण्यात विशेष काम करणाऱ्या व्यक्तींवर होणारा खर्च अमाप असतो. त्यामुळे आमदारांना चांगली पगारवाढ जरी असली तरी ती त्यांना कमी पडते, अशा शब्दांत खासदार शरद पवार यांनी आमदारांच्या पगारवाढीचे समर्थन केले.
शरद पवार उस्मानाबाद दौऱ्यावर आले होते. राज्यातील आमदारांच्या पगारवाढीबाबत पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील सर्व आमदारांचे एकमत झाले. त्यामुळे त्यांना पुन्हा चांगली पगारवाढ मिळाली आहे.
जलदगती न्यायालयात खटला चालवा
कोपर्डीच्या घटनेनंतर शाळा, महाविद्यालयीन विद्याíथनींमध्ये भीतीचे वातावरण आहे. अशा मुलींमधील भीती घालविण्यासाठी त्यांना सुरक्षेचे धडे देणे गरजेचे आहे. उस्मानाबाद येथील घटना निषेधार्ह आहे. या घटनेतील पीडित मुलीसह तिच्या कुटुंबीयांना पोलीस प्रशासनाने दिलासा दिलेला आहे. या घटनेचा तपास गतीने होण्यासाठी वरिष्ठ महिला पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. त्याबद्दल उस्मानाबाद पोलिसांनी दाखविलेल्या माणुसकीचे शरद पवार यांनी कौतुक करून हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा. आरोपीला कठोर शिक्षा होण्यासाठी योग्य रीतीने पोलिसांनी तपासकार्य करावे. त्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने व अशा घटना भविष्यात घडू नये, यासाठी पोलीस यंत्रणा व महाविद्यालयांनी दक्ष राहावे, असा संदेश जावा म्हणून उस्मानाबादपर्यंत आलो असल्याचे पवार यांनी सांगितले. पीडित मुलीची ओळख कळू नये म्हणून त्यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेण्याचे टाळले.
‘सरकारचे गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण नाही’
महाराष्ट्रासारख्या राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटना चिंताजनक आहेत. राज्यात महिला सुरक्षित राहण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा घालणे महत्त्वाचे आहे. मात्र राज्य सरकारचे गुन्हेगारी प्रवृत्तीवर नियंत्रण राहिलेले नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. उस्मानाबादमध्ये घडलेल्या अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराचा त्यांनी निषेध व्यक्त केला.