शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं औरंगाबामध्ये स्मारक होणार आहे. त्या स्मारकाला एमआयएमने विरोध दर्शवला आहे. महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत एमआयएम नगरसेवकाने विरोध दर्शवत विषय पत्रिका फाडली. त्यामुळे शिवसेनेचे नगरसेवक आक्रमक झाले. विरोध करण्याचा अधिकार सगळ्यांना आहे. विरोध करा, मात्र मस्ती करू नका. मस्ती कशी उतरवायची, हे शिवसेनेला माहिती आहे, असा इशारा शिवसेनेकडून देण्यात आला आहे. शिवसेनेचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख आंबदास दानवे, माजी आमदार प्रदीप जैस्वाल यांनी उपमहापौर आणि शिवसेना नगरसेवकांसह पालिका आयुक्तांची भेट घेतली. विषय पत्रिका फाडणाऱ्या एमआयएम नगरसेवकाविरोधात पालिकेने गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तत्पूर्वी शिवसेना नेत्यांनी पोलीस आयुक्त यशस्वी यादव यांची देखील त्यांनी भेट घेतली.

लोकशाहीमध्ये विरोध करण्याचा सर्वांना अधिकार आहे. लोकशाही मार्गाने विरोध दर्शवा. एकाद्या विषयावर मतदान घ्या. मात्र अशा पद्धतीने विरोध करण उचित नाही. मस्ती करू नका, ती कशी उतरवायची हे शिवसेनेला माहित आहे. पालिकेने संबंधित नगरसेवकाविरोधात कारवाई केली नाही, तर शिवसेना स्टाइलने उत्तर देऊ असा इशाराही शिवसेनेने दिला आहे.

दरम्यान, या मुद्द्यावर एमआयएम पक्षाने आपली भूमिका स्पष्ट केली आहे. शहरामधील रस्ते, पाणी स्वछता हे प्रश्न प्रलंबित असताना पालिका स्मारकावर पैसे खर्च करत आहे. त्यामुळे एमआयएमचा स्मारकाला विरोध आहे. आमच्या नगरसेवकाने स्वतःच्या हातातील विषय पत्रिका फाडली. दुसऱ्याच्या हातातील फाडली असती तर तो गुन्हा ठरला असता,  असं स्पष्टीकरण एमआयएमकडून देण्यात आलं.