छत्रपती संभाजीनगर : शहरातील पैठण गेट येथील व्यापारीपेठेत सोमवारी (१० नोव्हेंबर) रात्री अंदाजे १० वाजण्याच्या सुमारास जुन्या वादातून केलेल्या प्राणघातक हल्ल्यात एका दुकानदाराचा मृत्यू झाला. इम्रान अकबर कुरेशी (वय ३३) असे मृत दुकानदाराचे नाव आहे. दरम्यान, घटनेनंतर एका जमावाने तोडफोड केली. त्यानंतर पैठण गेट परिसरात पोलीस दाखल झाले होते.
इम्रान कुरेशी आणि आरोपींमध्ये जुना वाद होता. दोघेही एकाच भागात व्यवसाय करत होते. व्यवसायातून त्यांच्यात काही दिवसांपासून वाद सुरू होता, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पैठण गेट वरच सोमवारी रात्री हा वाद पुन्हा चिघळला, तेव्हा आरोपीने इम्रानवर तीक्ष्ण हत्याराने इम्रान कुरेशींवर प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात इम्रान गंभीर जखमी झाला. नागरिकांनी पोलिसांना व रुग्णवाहिकेला माहिती दिली, मात्र इम्रानला गंभीर शासकीय घाटी रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. ही घटना शहराच्या प्रमुख व्यापारी भागात घडल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
इम्रानचा मृतदेह शासकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) आणल्यानंतर त्याचे नातेवाईक, व्यापारी आणि स्थानिक नागरिकांचा मोठा जमाव रुग्णालयात जमला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी क्रांती चौक पोलिसांनी तातडीने रुग्णालयात आणि घटनास्थळी बंदोबस्त वाढविला आहे. क्रांती चौक पोलिसांनी पंचनामा केला. आरोपीच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. व्यापारी वर्गाने या घटनेवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
या हल्ल्यात इम्रान अकबर कुरेशी याचा मृत्यू झाला, तर त्याचा भाऊ इब्राहिम जखमी झाला. चार दिवसांपूर्वी मोवाइल दुकानावरून झालेल्या वादातून एसएस टेलिकॉमच्या दुकानातील कामगार परवेज याने हल्ला केला. हे बघून कुणीही मदतीला धावले नाही. या घटनेनंतर संतप्त जमावाने वाहनांची तोडफोड केल्यामुळे परिसरात मोठा तणाव होता. उपायुक्त पंकज अतुलकर, गुन्हे शाखेचे निरीक्षक गजानन कल्याणकर, एसआरपीएफचे जवान अतिरिक्त कुमकसह दाखल झाले होते.
