छत्रपती संभाजीनगर : बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील खडकत गावात झेंडा काढल्यावरून शुक्रवारी सकाळी दोन गटांमध्ये दगडफेक झाली. या घटनेमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती आष्टीचे पोलीस निरीक्षक शरदकुमार भुतेकर यांनी दिली.

खडकत गावात एक झेंडा काढण्याचा प्रकार गुरुवारी सकाळी घडला. दुपारी काही जणांमध्ये वाद झाला. या वादाचे पर्यवसान शुक्रवारी सकाळी दगडफेकीत झाले. या घटनेत पाच ते सहा तरुण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमींना आष्टीच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. दगडफेकीच्या घटनेतील आरोपींना शोधण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. आठ ते दहा दिवसांपूर्वी खडकतहून आष्टीकडे जाणाऱ्या एका चौकात एक झेंडा लावण्यात आला होता. हा झेंडा बुधवारी रात्री काढण्यात आला. गुरुवारी सकाळी झेंडा काढल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यावरून नाराजी, वाद पेटण्यास सुरुवात झाली. शुक्रवारी सकाळी अचानक दगडफेक सुरू झाली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खडकत गावातील एका नेत्याने सांगितले की, काही दिवसांपूर्वी एका चौकातील झेंडा हटवण्यावरून दोन गटांमध्ये मतभेद झाले होते. त्यावेळी पोलीस, उपअधीक्षक, तहसीलदारांनी भेट दिली होती. त्यावेळी सामंजस्याने वाद मिटलाही होता. परंतु अन्य एका तिसऱ्याच गटाने फूस लावून वाद भडकवण्याची भूमिका वठवली आणि सकाळी दगडफेक सुरू झाली. यामध्ये चार ते पाच तरुण जखमी झाले. एकाची प्रकृती गंभीर आहे.