ग्रामीण भागातील मुलांना प्रशासन सेवेत जाण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळावे, या हेतूने परळी येथे आयएएस स्टडी सर्कल स्थापन केली असून विद्यार्थ्यांसाठी २४ तास ग्रंथालय व अभ्यासिका उपलब्ध असणार आहे. या केंद्राचे उद्घाटन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. १६) होणार असून, अमरावतीचे जिल्हाधिकारी किरणकुमार गित्ते यांच्या ‘आयएएस अधिकारी होण्याचे सात टप्पे’ या पुस्तकाचे प्रकाशनही या वेळी होणार आहे. संचालिका उषा गित्ते यांनी ही माहिती दिली.
परळी तालुक्यातील असलेल्या गित्ते यांनी आयएएस स्पर्धा परीक्षेतून जिल्हाधिकारीपदावर झेप घेतली. ग्रामीण भागातील मुलांना प्रशासन सेवेत जाता यावे, त्यांना योग्य मार्ग सापडावा, स्पर्धा परीक्षांची गोडी मुलांमध्ये वाढावी, या साठी परळी शहरात मार्गदर्शन केंद्र सुरू केले. उषा किरण गित्ते यांच्या पुढाकारातून विद्यानगर परिसरातील वैद्यनाथ नìसग कॉलेजच्या इमारतीत आयएएस स्टडी सर्कल सुरू केले आहे. विद्यार्थ्यांसाठी २४ तास ग्रंथालय, अभ्यासिका सुरू राहील. ग्रंथालयात सर्व प्रकारची मराठी-इंग्रजी भाषांतील पुस्तके उपलब्ध असतील. मानव विकास मिशनचे आयुक्त भास्करराव मुंडे, लातुरचे जिल्हाधिकारी पांडुरंग पोले, पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, मिशन आयएएसचे संचालक डॉ. नरेशचंद्र काठोळे या वेळी उपस्थित राहणार आहेत.