मराठवाडय़ातील जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळांमध्ये वर्ग दोनच्या मुख्याध्यापकांची ९५ टक्के पदे रिक्त आहेत. विद्यार्थ्यांना बसण्यासाठी चांगल्या इमारती नाहीत. शिक्षणाच्या गुणवत्तेचे माध्यमिक शिक्षणातील प्रश्न तर चर्चेच्या पटलावरही नाहीत. अशा वातावरणात शिक्षक मतदारसंघात खात्रीने निवडणुकीच्या रिंगणात उभे राहणाऱ्या उमेदवारांनी मराठवाडाभर दौरे करायला सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या ताब्यात असणारा हा मतदारसंघ आपल्याकडे वळविण्यासाठी भाजपने जोर लावला आहे. मात्र, शिक्षक संघटनांच्या कामांकडे सहानुभूती असणारा मोठा वर्ग मतदार असल्याने मराठवाडा शिक्षक संघाचे उमेदवार व्ही.जी. पवार तसेच विक्रम विठ्ठल मोरे यांच्या मतदानावर गणित बदलू शकेल, असा दावा केला जात आहे. त्यातच शिक्षण खात्यात काम करताना नि:स्पृह अधिकारी म्हणून नाव कमाविलेले सहस्रबुद्धे नशीब अजमावीत असले तरी त्यांना शिक्षक स्वीकारतात का, हा महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भाजपचे उमेदवार सतीश पत्की आणि राष्ट्रवादीचे उमेदवार विक्रम काळे यांनी धडाकेबाज प्रचार सुरू केला असला तरी शिक्षक संघटनांमधील एकजूट निवडणुकीचे निकाल बदलविण्यापर्यंत ताकद असणारी आहे.  औरंगाबाद विभाग विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये दाखल झालेल्या अर्जामध्ये प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवाराबरोबरच आणखी एक नाव चर्चेत आहे ते म्हणजे दिलीप सहस्रबुद्धे यांचे. शिक्षण क्षेत्रात राहून चिरीमिरीच्या फंद्यात नसणारा अधिकारी अशी त्यांची ओळख आहे. उस्मानाबादमध्ये शिक्षणाधिकारी, लातूरमध्ये शिक्षण उपसंचालक म्हणून काम करणाऱ्या सहस्रबुद्धे यांच्या मागे पुरेसे पाठबळ असेल का, अशी शंका निर्माण केली जाऊ शकते. मात्र, एक नि:स्पृह अधिकारीही या वेळी निवडणूक मैदानात आहे. कायदेशीर कामाला न रोखणारा आणि बेकायदेशीर काम स्वत:च्या सहीने होऊच न देणारा अशी दिलीप सहस्रबुद्धे यांची ओळख त्यांना मतदान मिळवून देण्यास उपयोग पडेल काय, हे निकालानंतर स्पष्ट होईल. मात्र निवडणुकीच्या रिंगणात या वेळी काही चांगले चेहरेही दिसू लागले आहेत. शिक्षक संघटना म्हणून वैयक्तिक संपर्काच्या जोरावर व्ही. जी. पवार यांचेही काम चांगले आहे. तसेच शिवसेनेचे उमेदवार गोविंद काळे यांचाही संपर्क चांगला आहे. मात्र, प्रमुख राजकीय पक्षांच्या उमेदवारांना हे उमेदवार टक्कर देतील काय, हे निकालानंतर स्पष्ट होईल. या अनुषंगाने बोलताना मराठवाडा शिक्षक संघाचे व्ही. जी. पवार म्हणाले, आम्ही शिक्षकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने लढतो आहोत. मराठवाडय़ात दर्जेदार शिक्षणाचा पॅटर्न निर्माण करायचा असेल तर पर्यवेक्षकीय यंत्रणा अधिक मजबूत करण्याची गरज आहे. रिक्त जागा भरण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करायला हवा. त्यासाठी निवडणुकीतून प्रचार करणार असल्याचे ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार विक्रम काळे म्हणाले की, दर्जेदार शिक्षणासाठी ई-लर्निगचा प्रयोग सर्वत्र करणार आहे. सर्व शाळा डिजिटल करून दर्जा कायम ठेवण्यासाठी शिक्षकांच्या समस्या सोडवणुकीसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. या मुद्दय़ावर बोलताना भाजपचे सतीश पत्की म्हणाले, शिक्षकांना चांगले प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. राष्ट्रनिर्माणाची भावना जागृत करून शिक्षकांना अधिक सोयी मिळतील, यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

शिक्षक मतदारसंघात आता रिंगणात उतरण्याच्या तयारीत असलेल्या उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. या मतदारसंघात दोन आकडी उमेदवारांची संख्या राहील, अशी शक्यता आहे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Teacher condition in maharashtra
First published on: 20-01-2017 at 00:53 IST