औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील १६ पैकी १२ ग्रामपंचायतीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या आमदारांचा पगडा असल्याचे गुरुवारी ग्राम पंचायत निवडणुकीनंतर स्पष्ट झाले. आमदार संदीपान भुमरे, अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाठ यांचे समर्थकच निवडून आल्याचा दावा करत निवडणुकीनंतर जल्लोष करण्यात आला. पैठण तालुक्यातील सात ग्रामपंचायत निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. त्यातील एक ठिकाणी राष्ट्रवादीचा तर अन्य सर्व ग्रामपंचायतींमध्ये आमदार भुमरे यांचे समर्थक निवडून आले. सिल्लोड मतदारसंघातील तीन ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सर्व ठिकाणी सत्तार समर्थक निवडून आले. शिवसेनेची पीछेहाट झाल्याचा दावा केला जात आहे. वडगाव कोल्हाटीसारख्या मोठय़ा ग्रामपंचायतीमध्ये शिवसेना नेत्यांनी लक्ष घातले होते तेथेही सेनेचा पराभव झाला. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीतही शिंदे गटाचा वरचष्मा असल्याचा दावा संदीपान भुमरे यांनी केला आहे. बजाजनगर या औरंगाबाद शहराजवळील ग्रामपंचायतीवरही आमदार संजय शिरसाठ यांच्या समर्थकांचा विजय झाल्याने तेही निवडणुकीनंतर सदस्यांच्या जल्लोषात सहभागी झाले होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: The supremacy eknathshisde group gram panchayats election ysh
First published on: 06-08-2022 at 00:02 IST