सुहास सरदेशमुख
छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाच्या ३० पैकी तीन ‘रिसॉर्ट’चा संपूर्ण कारभार आता महिलांच्या हाती दिला जाणार आहे. अगदी व्यवस्थापकापासून ते सेवा देणारे कर्मचारी आणि सुरक्षारक्षकही महिलाच असतील, असे नियोजन करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर, नागपूर, खारघर येथील रिसॉर्टमध्ये महिलांच्या हाती पर्यटनाची दोर दिली जाणार आहे. या योजनेची अंमलबजावणी नोव्हेंबरपासून केली जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाच्या संचालक श्रद्धा जोशी यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. केवळ एवढेच नव्हे, तर पर्यटन महामंडळाच्या या रिसॉर्टमधून आता जेवणातून कृत्रिम रंग आणि ‘अजिनोमोटो’सारख्या घटकांचा वापरही बंद करण्यात आला आहे.




पर्यटन क्षेत्रात लिंगभाव समानता आणणारे धोरण महाराष्ट्र सरकारने देशात पहिल्यांदा आखले आणि स्वीकारले. त्यामुळे अनेक बदल करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आल्याचे सांगत श्रद्धा जोशी म्हणाल्या, ‘‘करोनानंतर पर्यटनाला चालना देणाऱ्या अनेक बाबी नव्याने सुरू करण्यात आल्या आहेत. करोनाकाळात तीन ते पाच कोटी रुपयांमध्ये तोटय़ात असणारे मंडळ आता नऊ कोटी रुपयांपेक्षा अधिकने नफ्यात आहे. यासाठी तीन प्रकारचे बदल करण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली. पायाभूत सुविधांमध्ये वाढ, सेवांमधील त्रूटी दूर करणे आणि ग्राहकांच्या मनाला शांतता लाभेल असे नवनवे उपक्रम आखले जात आहेत. त्यांना कुठे साहसी खेळांशी जोडले जात आहे, तर काही ठिकाणी आकाशदर्शनासारखे उपक्रमही हाती घेण्यात आले आहेत. यातून आता तीन रिसॉर्ट मधील सेवा पूर्णत: महिलांच्या हाती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.’’
या तीन ‘रिसॉर्ट’मध्ये नव्याने तीन व्यवस्थापक पदे, १२ मध्यम श्रेणीतील कर्मचारी आणि ३५ सेवा क्षेत्रातील महिलांची नेमणूक केली जाणार आहे. केवळ ‘रिसॉर्ट’ चालविणारेच नव्हे, तर जबाबदार आणि सुरक्षित पर्यटनाला चालना देणारे कर्मचारी, अगदी टॅक्सी चालकही महिला असावी, असे प्रयत्न केले जाणार आहेत. या क्षेत्रातील संयोजकांना लिंगभाव समानता जपण्यास प्रोत्साहन देण्याचाही विचार असल्याचेही जोशी यांनी सांगितले. प्रत्येक पर्यटकास आपल्या आरोग्याची योग्य काळजी राखली जात आहे, असा संदेश देण्यासाठी ‘रिसॉर्ट’मधील खाद्यपदार्थात कोणत्याही प्रकारचे कृत्रिम खाद्यपदार्थ न वापरण्याची मोहीम गेल्या सहा महिन्यांपासून अमलात आणली जात आहे. या बहुतांश रिसॉर्टमध्ये आता भाज्याही पिकविल्या जाव्यात आणि पर्यटकांनी तोडून आणलेली भाजी त्यांच्या जेवणात समाविष्ट करता येईल का, हेही तपासून पाहिले जात असल्याचे जोशी यांनी सांगितले.
बदल काय?
- ‘रिसॉर्ट’ चा सर्व कारभार महिलाच सांभाळतील
- व्यवस्थापकपदापासून ते सुरक्षारक्षकांपर्यंत आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांपासून ते दालन सेवेमध्ये महिलाच असतील
- रिसॉर्टमधील खाद्यपदार्थातून कृत्रिम रंग आणि ‘अजिनोमोटो’सारख्या पदार्थाचा वापर बंद