या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गतवर्षी तुरीचे उत्पादन जवळपास दुप्पट झाले व भावाच्या घसरणीमुळे शेतकरी संकटात सापडला. शेतकऱ्यांसमोर दुसऱ्या वाणाचा पर्याय नसल्यामुळे पुन्हा या वर्षी तुरीच्या पेऱ्यात वाढ झाल्यामुळे शेतकरी चक्रव्युहात सापडणार आहे.

भारतात सरासरी तुरीचे उत्पादन २५ लाख टन होते. गतवर्षी पेरा अधिक झाला व पाऊस चांगला झाल्यामुळे तब्बल ४६ लाख टन उत्पादन झाले. या वर्षी ३० जूनपर्यंत तुरीची सरासरीपेक्षा २९ टक्क्यांनी पेरणी अधिक झाली आहे. ३० जून रोजी राज्य कृषी मंत्रालयाने पेरणीची आकडेवारी जाहीर केली. २००७ सालापासून तुरीच्या निर्यातीवर घातलेली बंदी अद्यापही कायम आहे. वास्तविक जगात सर्वात गुणवत्ताधारक तूरडाळ भारतात उत्पादित होते. मात्र, आपल्या शेतकऱ्याला जगाची कवाडे जाणीवपूर्वक बंद करण्यात आली आहेत. याउलट उत्पादन वाढलेले असतानाही आयात मात्र चालूच राहते. म्यानमार, आफ्रिका येथून येणाऱ्या तुरीवर फारसा आयात करही वाढवला जात नाही.

गतवर्षी तुरीचा हमीभाव ५ हजार ५० रुपये होता. तूर खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची परवड झाली, त्यामुळे ३ हजार रुपये िक्वटल दराने शेतकऱ्यांनी बाजारपेठेत तूर विकली. सध्या ३ हजार ६०० रुपये िक्वटल तुरीचा भाव आहे. अद्याप शेतकऱ्यांकडे देशभरात किमान ६ लाख टन तूर शिल्लक असल्याचा अंदाज आहे. गतवर्षी मुगाचा हमीभाव ५ हजार २२५ रुपये होता. सध्या बाजारपेठेतील मुगाचा भाव ४ हजार ४०० रुपये आहे. मसुरीचा हमीभाव ३ हजार ९५० रुपये होता व बाजारपेठेतील भाव ३ हजार ३०० रुपये आहे. जेव्हा भाव पडलेले असतात तेव्हा ग्राहक पडलेल्या भावाने खरेदी करतो.

या वर्षी राज्यभरात जून महिन्यात सरासरी २१८ मि.मी. इतका पाऊस झाला आहे. तो मासिक सरासरीच्या ९७.९ टक्के इतका आहे. नागपूर विभागात ६२.१ व अमरावती विभागात ८९.२ टक्के पाऊस आहे. उर्वरित भागात सर्वसाधारण पाऊस असल्यामुळे खरीप हंगामाची पेरणी अतिशय चांगली झाली आहे. गेल्या दहा दिवसांपासून पावसाने खंड दिला असल्यामुळे शेतकरी पुन्हा चिंतेत आहेत. हा खंड किती काळ राहतो यावर खरीप हंगामाचे भवितव्य आहे. हवामान विभागाने या वर्षी पाऊस चांगला राहील व खरीप हंगामाचे उत्पादनही चांगले राहील असे भाकीत वर्तवले आहे. तेलबियांचे भाव कोसळले आहेत. सूर्यफूल व करडई याची विक्री गेल्या दोन वर्षांपासून हमीभावापेक्षा कमी भावाने बाजारपेठेत होत असून सोयाबीनच्या भावात तर गेल्या वर्षभरापासून वाढ झाली नाही.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Toor dal issue farmers issue
First published on: 05-07-2017 at 03:31 IST