नर-मादी धबधब्यामुळे देशभरातील पर्यटकांना आपल्याकडे खेचणाऱ्या नळदुर्गच्या किल्ल्यात आता काळ्या पाषाणात बांधलेला कारंज्याचा नवीन हौद सापडला आहे. पुरातत्त्व विभागाने हा किल्ला एका खासगी कंपनीला पर्यटनाच्या विकासासाठी भाडेतत्त्वाने करारावर दिला आहे. किल्ल्यालगत असलेल्या नदीपात्रातील गाळ काढताना हा आकर्षक हौद समोर आल्यामुळे या किल्ल्यातील काळाच्या पडद्याआड गेलेल्या ऐतिहासिक बाबींना त्यानिमित्ताने उजाळा मिळण्याची शक्यता आहे.
नळदुर्ग येथील ऐतिहासिक किल्ला सोलापूर येथील विकासकाने १० वषार्ंच्या भाडेतत्त्व करारावर घेतला आहे. किल्ल्यालगत असलेल्या बोरी नदीतील गाळ काढणे, नदीचे खोलीकरण तसेच रुंदीकरण करण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. नदीपात्रात गाळ काढताना एक मोठा पुरातन व आकर्षक बांधकाम असलेला हौद सापडला आहे. काळ्या पाषाणात बांधलेला हा हौद, त्यातील कारंजाची सोय, त्याशेजारी बसण्यासाठी खोली पाहण्यासाठी इतिहासप्रेमी नागरिकांची गर्दी होत आहे. पुरातत्त्व खात्याच्या अधिकारी गोरे यांनीही या हौदाची पाहणी केली.
नळदुर्गचा प्राचीन व ऐतिहसिक किल्ला १० वर्षांच्या बीओटी करारावर घेतल्यानंतर युनिटी मल्टीकॉन या विकासक कंपनीने किल्ल्यात पर्यटकांसाठी विविध सुविधा उपलब्ध करण्याबरोबरच प्रेक्षणीय स्थळांची दुरुस्ती करण्याचे काम हाती घेतले आहे. कंपनीचे कार्यकारी संचालक कपिल मौलवी यांनी किल्ल्यात व किल्ल्यालगत असणाऱ्या बोरी नदीतील गाळ काढण्याबरोबरच नदीचे खोलीकरण व रुंदीकरण करण्याचे काम सुरू केले आहे. बोरी नदी ही एकेकाळी नळदुर्ग शहराची तहान भागवीत होती. मात्र बोरी धरण झाल्यानंतर या नदीकडे प्रशासन तसेच शहरवासीयांचे दुर्लक्ष झाले. त्यामुळे या बोरी नदीला अवकळा प्राप्त झाली होती. मागील ५० वर्षांपासून नदीतील गाळ काढला नसल्याने नदी पूर्णपणे गाळाने माखली होती. नदीचे पात्रही अरुंद आहे. मात्र विकासकाने पर्यटकांसाठी नदीत बोटिंग करण्यासाठी गाळ काढण्याबरोबरच नदीपात्राचे रुंदीकरण व खोलीकरण करण्याचे काम सुरू केले. बोरी नदीतील गाळ काढण्याची मागणी शहरवासीयांतून तसेच शेतकऱ्यांमधून गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे केली होती. मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने बोरी नदी गाळाने तुडुंब भरली. कंपनीने स्वखर्चाने पाणीमहाल ते अंबाबाई मंदिरापर्यंतच्या अंतरावरील बोरी नदीतील गाळ काढण्याचे काम हाती घेतले आहे. यामुळे बोरी नदीला गतवैभव प्राप्त होणार आहे.
नदीत असलेल्या १५ बाय ६ फूट लांबी-रुंदीच्या या हौदाची पुरातत्त्व विभागाच्या अधिकारी गोरे यांनी पाहणी करून हौद व १७ बाय ६ लांबी-रुंदी आकारातील खोली ही १७ व्या शतकात बांधली असण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 9th Oct 2015 रोजी प्रकाशित
नळदुर्ग किल्ल्याच्या पर्यटनाला विकासकाकडून चालना
नर-मादी धबधब्यामुळे देशभरातील पर्यटकांना आपल्याकडे खेचणाऱ्या नळदुर्गच्या किल्ल्यात आता काळ्या पाषाणात बांधलेला कारंज्याचा नवीन हौद सापडला आहे.
Written by बबन मिंडे
First published on: 09-10-2015 at 01:20 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Tourism of naldurg fort by developer