औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विभाजन करून उस्मानाबाद उपकेंद्राला किंवा लातूर येथे नवीन विद्यापीठ करण्याचा कोणताही मानस नाही, असे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शनिवारी पत्रकार बैठकीमध्ये स्पष्टपणे सांगितले. लातूर येथे स्वतंत्र तसेच उस्मानाबाद उपकेंद्राचे पूर्ण विद्यापीठ करण्याच्या हालचाली सुरू असल्याचा गैरसमज पसरविला जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे नाव उंचावण्याचे काम महाविकास आघाडी शासन करेल, असेही ते म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पैठण येथील संतपीठाच्या कामासाठी येत्या काही दिवसात शासन निर्णय निघेल. संत तुकोबाराय यांच्या नावाने संतपीठ सुरू करण्यासाठी लागणारा २२ कोटी रुपयांचा निधी सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने द्यावा, नंतर तो शासनाकडून दिला जाईल. या संतपीठामधील अभ्यासक्रमही ठरले असल्याचे शिक्षणमंत्री सामंत म्हणाले. प्राध्यापक भरती प्रक्रियेला असणारी स्थगिती उठविण्याच्या अनुषंगाने लवकरच उपमुख्यमंत्री अजित पवार हे निर्णय घेणार आहेत. तसेच सातव्या वेतन आयोगाचे प्रश्नही मार्गी लावले जातील,असेही त्यांनी सांगितले. ‘ऑफलाईन’ परीक्षा केंद्रावरील सुविधांसाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांच्याशीही चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, गेल्या दोन दिवसांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे विभाजन होऊन लातूर येथे नव्या विद्यापीठ निर्मितीची चाचपणी सुरू झाली असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र,तसा कोणताही राज्य सरकारचा विचार नसल्याचे सामंत यांनी सांगितले.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Uday samant talk about division of dr babasaheb ambedkar marathwada university zws
First published on: 21-09-2020 at 00:13 IST