बीट, टोमॅटो, आंबा, चॉकलेटपासूनही शेवया

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुहास सरदेशमुख औरंगाबाद</strong>

सणासुदीला घरोघरी शेवयाची खीर होतेच. पण या शेवया किती पौष्टिक होऊ शकतील? औरंगाबादच्या उद्योजक महिला जया जगदीश साब्दे यांनी बीट, टोमॅटो, पालक, पुदिना, नाचणी, ऊस, आंबा, चॉकलेट आणि फुलकोबीपासूनदेखील शेवया बनविल्या आहेत. विशेष म्हणजे या उद्योजक महिलेला आता ‘मुद्रा’ योजनेतून कर्ज मिळाले आहे. मुद्रा योजनेची वाताहत सुरू असताना काही हाताच्या बोटावर मोजता येण्यासारखी चांगली उदाहरणेही आहेत, त्यात जया साब्दे यांच्या नावाचा उल्लेख करावा लागेल. त्या म्हणतात, कर्ज मिळविण्यासाठी फक्त व्यवसायाचे कौशल्य असून भागत नाही. बँकेचे व्यवस्थापकही ओळखीचे लागतात. अनेकदा प्रयत्न केल्यानंतर एका भल्या माणसाला माझ्यातील उद्योजकता योग्य असल्याचे वाटले आणि त्यांनी १० लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्याचे ठरविले आहे.

शहरातील बीड वळण रस्त्याजवळ राहणाऱ्या जया साब्दे यांच्या घरी तसे कोणीही उद्योजक नव्हते. एकत्र कुटुंबपद्धतीत राहणाऱ्या जयाताईंचे दीर आजारी होते. जाऊही नोकरी करायची. परिणामी घरकाम हेच मुख्य काम बनलेले. ते संपल्यानंतर काय करावे, असा प्रश्न होता. पहिले काही दिवस मिर्चीमसाल्याचा व्यवसाय करून बघितला. त्यासाठी त्यांनी बचतगटाकडून ४० हजार रुपयांचे कर्ज घेतले. नंतर या व्यवसायातून शेवया करण्याचा उद्योग सापडला.

आता घराच्या गच्चीवर शेवयासाठी त्यांनी मशीन  बसविले आहे आणि नूडल्सच्या जमान्यात शेवयाचा पौष्टिकपणा वाढविण्यासाठी त्या वेगवेगळे प्रयत्न करत आहेत.

शेवया तयार करताना पीठामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आणि फळांचा रस त्या मिसळतात. त्यामुळे वेगवेगळ्या रंगातल्या शेवया त्यांच्याकडे उपलब्ध आहेत. पहिल्या काही दिवसांत काही ग्राहकांना त्यांनी अगदी मोफत शेवयाची चव चाखण्यासाठी दिली आणि नंतर त्यांच्या पदार्थाना मागणी वाढू लागली. आता त्यांच्या हाताखाली पाच जणी काम करतात. सिद्धी गृहउद्योग असे त्यांनी उद्योगाला नाव दिले आहे. स्वत: तयार केलेले पदार्थ स्वत: विकायचे असे ठरवून त्यांनी त्यासाठीही प्रयत्न सुरू केले आणि सहा दिवसांत एक क्विंटल शेवयांची विक्री केली. हा उद्योग उभा करण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रातून त्यांनी प्रशिक्षण घेतले आणि चव बदलून स्वत:चा व्यवसाय त्यांनी वाढविला. आता चेन्नई, बंगळूपर्यंत त्यांचे हे पदार्थ विक्रीसाठी जातात.

व्यवसाय उभारताना मोठय़ा अडचणी आहेत, असे त्या सांगत होत्या. भांडवल उभे करणे ही अडचण असते. पैसे घेतल्याशिवाय कोणी कामच करत नाही, हे पदोपदी जाणवते. पण विविध प्रशिक्षणांना हजेरी लावून आपण करत असलेल्या व्यवसायाची माहिती अनेकांपर्यंत पोहोचवत राहिल्याने आपण या व्यवसायात अधिक पाय रोवून उभे ठाकू, असा विश्वास त्यांना वाटतो. मुद्रा योजनेतून कर्ज मिळाल्यामुळे आता व्यवसाय अधिक वाढवता येईल, असे त्या सांगतात. मात्र, कर्ज देताना ते योग्य व्यक्तीला जात आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी बँक अधिकारी जो वेळ घेतात, तो कालावधी कमी करण्याची आवश्यकता आहे.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Vermicelli from beet tomatoes mango and chocolate
First published on: 19-09-2018 at 02:53 IST