छत्रपती संभाजीनगर : जागतिकीकरणाच्या नंतरचे जे भारतीय सांस्कृतिक पटल आहे, त्याचे ‘जिगीषा’ हे उत्तम उदाहरण आहे. अंतर्गत सर्जनात्मक कलात्मकता जपत जिगीषाच्या सर्व मंडळींनी हौस म्हणून हा नाट्य सहवास सुरू ठेवला आहे. विशेषत: नव्या ऊर्जेचे व्यासपीठ म्हणजे जिगीषा नाट्य सहवास असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ नाटककार, दिग्दर्शक सतीश आळेकर यांनी यावेळी काढले.
‘जिगीषा’च्या ४० व्या वर्धापनदिनापासून सुरू झालेल्या नाट्यमहोत्सवाचे यंदाचे तिसरे वर्ष असून, शनिवारी या नाट्यमहोत्सवाचा उद्घाटन समारंभप्रसंगी ते बोलत होते. एमजीएम परिसरात महात्मा गांधी मिशन आणि ‘मराठवाडा आर्ट, कल्चर अँड फिल्म फाउंडेशन’ यांच्या सहकार्याने हा नाट्यसहवास आयोजित करण्यात आला असून, यावेळी ज्येष्ठ नाटककार व दिग्दर्शक सतीश आळेकर यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
जिगीषा, ‘महात्मा गांधी मिशन’ आणि ‘मराठवाडा आर्ट, कल्चर अँड फिल्म फाउंडेशन’तर्फे दिला जाणारा यंदाचा ‘मिलिंद सफई स्मृती पुरस्कार’ नाट्यकर्मी अभिजित झुंझारराव या दिग्दर्शक-अभिनेत्याला मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान करण्यात आला. स्मृतिचिन्ह, शाल आणि १० हजार रोख रक्कम असे पुरस्काराचे स्वरूप आहे. यावेळी एमजीएमचे सचिव अंकुशराव कदम, कुलगुरू डॉ. विलास सपकाळ, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, प्रशांत दळवी, कुलसचिव डॉ. आशिष गाडेकर, नीलेश राऊत आदींसह मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर म्हणाले, जिगीषा नाट्य सहवासच्या माध्यमातून निर्माण होणारा सहवास कायम राहतो. दिग्दर्शक, नाटककार यांनी एकत्रित येऊन सुरू केलेला हा सहवास महत्त्वपूर्ण आहे. कलेची आतली उर्मी अधिक महत्त्वाची असून, ती जपत रंगभूमी चांगल्या अर्थाने सर्जनशील होत आहे. पुढच्या वर्षीपासून या सहवासात सुरू होणाऱ्या एकांकिका स्पर्धेत नवीन अथवा १०० वर्षांपूर्वीच्या एकांकिका सादर व्हायला हव्यात, असे मला वाटते. नाट्यकर्मी अभिजित झुंजारराव यांनी नोकरी सोडून गेल्या १३-१४ वर्षांपासून मी नाटक करतोय, यामध्ये बऱ्याच लोकांचे मला सहकार्य लाभत असल्याच्या आपल्या सिने-नाट्य क्षेत्रातील प्रवासाची माहिती दिली.प्रास्ताविक दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. शिव कदम यांनी केले.
महोत्सवात आज, उद्या काय ?
महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी २३ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता ज्येष्ठ नाटककार सतीश आळेकर यांच्या समवेत विशेष संवाद व्ही. शांताराम सभागृहात आयोजित करण्यात आलेला आहे. सायंकाळी ५ वाजता ‘चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे’ या पुस्तकातील निवडक प्रकरणांचे अभिवाचन प्रतीक्षा लोणकर व चंद्रकांत कुलकर्णी व्ही. शांताराम सभागृहात सादर करतील. सायंकाळी जयेश आपटे दिग्दर्शित आणि पर्ण पेठे, सिद्धेश पुरकर अभिनित ‘तोत्तोचान’ या नाटकाचा प्रयोग रुक्मिणी सभागृहात सादर होणार आहे.
२४ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वा. ‘नरहर कुरुंदकर : एका विचारवंताची अपरिचित गोष्ट’ हे अभिवाचन अजय अंबेकर आणि ज्योती अंबेकर सादर करतील. रात्री चंद्रकांत कुलकर्णी दिग्दर्शित ‘भूमिका’ हे नाटक एकनाथ नाट्य मंदिरामध्ये सादर होईल.