छत्रपती संभाजीनगर : बकरीभक्ष्य केल्याच्या रागातून अजगराला ठार मारून विळ्याने पोट फाडून शेळी बाहेर काढत नाचतानाचा चित्रफीत तयार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सोयगाव तालुक्यातील अजिंठा डोंगराला लागून असलेल्या बहुलखेडा गावालगच्या मोतडी शिवारात सोमवारी घडलेली ही घटना आहे. याप्रकरणी मनुष्य व वन्यजीव संघर्ष समितीचे सदस्य तथा सिल्लोडच्या अभिनव प्रतिष्ठानचे संचालक डॉ. संतोष जानकीराम पाटील यांनी सिल्लोड प्रादेशिक वनविभागाच्या सहायक वनसंरक्षक कार्यालयाकडे ७ ते ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार नोंदवली आहे.

या प्रकरणात डॉ. पाटील यांच्या तक्रारीनुसार मोतडी शिवारात एका गुरख्याचा बकरा इंडियन रॉक पायथॉन प्रजातीतील अजगराने भक्ष्य केला. परिणामी अजगराची हालचाल मंदावली. मेंढपाळास त्याच्याकडील बकऱ्यांच्या संख्येत एक कमी आढळून आल्याने तो शोध घेत असताना त्याला सुस्त पडलेल्या अवस्थेत अजगर आढळून आला. त्यानंतर घटनास्थळी गावातील ७ ते ८ जण जमा झाले व त्यांनी केवळ सूड भावनेने जिवंत अजगराचे अमानुषपणे विळ्याने पोट फाडून पोटातील बकरा बाहेर काढतानाची व त्याच्या शरीरावर बुटासह उभे राहिल्याची चित्रफित काढून ती समाज माध्यमावर प्रसारित केली. हा अमानुष प्रकार अत्यंत गंभीर असून, या प्रकरणतील सर्व आरोपींचे चेहरे चित्रफितीत स्पष्ट दिसत आहेत. अनुसूचि- २ मधील १९७२ च्या वन्यजीव संरक्षन कायद्याने ही घटना मोठा गुन्हा आहे.

सर्व आरोपींवर त्वरीत गुन्हा दाखल करून त्यांना अटक करावी. सोयगाव येथील वन कर्मचारी मुख्यालयी राहत नसल्याने अनेक घटना या भागात घडतात. याप्रकरणी योग्य ती कार्यवाही न झाल्यास आम्ही छत्रपती संभाजी नगर येथील उपवनसंरक्षक कार्यालयासमोर उपोषण करू, असा इशारा तक्रारीतून देण्यात आला आहे.

या घटनेचा पंचनामा करण्यात आला असून चौकशी सुरू आहे. याप्रकरणी सोयगाव वनविभागाच्या कार्यालयात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळावरील चित्रफितीच्या आधारे तपास करण्यात येत असून, यामध्ये उमेदखाँ उस्मान तडवी व अफरोस नजीर पठाण यांची नावे समोर आली आहेत. अद्याप त्यांना अटक करण्यात आलेली नाही. शमीम तडवी, वनरक्षक, सोयगाव.

अजगराला ठार करून चित्रफित काढणे अमानुष घटना आहे. याप्रकरणी ७ ते ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करावा, अशी तक्रार दाखल केली आहे. डॉ. संतोष पाटील, सदस्य, मानव – वन्यजीव संघर्ष समिती, सोयगाव वनविभाग