औरंगाबाद : गोवंश हत्या बंदी असतानाही केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी भोकरदन येथे मुस्लीम समाजाच्या मेळाव्यात केलेले वक्तव्य निषेधार्ह असल्याचे सांगत माफी मागा अन्यथा तीव्र अंदोलन केले जाईल, असा इशारा विश्व हिंदू परिषदेच्या वतीने बुधवारी देण्यात आला. केवळ मतासाठी हा प्रकार आहे, असा आरोप विश्व हिंदू परिषदेच्या पत्रकार बैठकीत करण्यात आला. या पत्रकार बैठकीस संजय बारगजे आणि राजेश जैन यांनी माफी न मागितल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे. भाजप मंत्र्याच्या विरोधात परिवारातील एखाद्या संघटनेने जाहीरपणे उतरण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात येत आहे.

भोकरदन मतदार संघातील रावसाहेब दानवे यांच्या या वक्तव्याची चित्रफीत मंगळवारी समाजमाध्यमातून दिसत असल्यामुळे या अनुषंगाने मंत्री दानवे यांनी खुलासाही केला. त्यांनी विश्व हिंदू परिषदेचे देवगिरी प्रांताचे अध्यक्ष संजय बारगजे यांना दूरध्वनी केला होता. अशा प्रकारचे वक्तव्य केले नाही, तर ती चित्रफितीमध्ये बदल केली असल्याचे रावसाहेब दानवे यांनी सांगितल्याचे बारगजे म्हणाले. मात्र तसे सिद्ध करा. ज्यांनी हे काम केले आहे त्यांच्यावर कारवाई करा आणि गोहत्या बंदी कायद्याची प्रभावी अंमलबजावणीसाठी काम करा, असा सल्लाही मंत्री दानवे यांना या वेळी देण्यात आला. त्यांनी केलेले हे वक्तव्य बेकायदेशीर असून पक्षाच्या वैचारिक भूमिकेच्या विरोधात आहे, असेही विश्व हिंदू परिषदेने दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे.