छत्रपती संभाजीनगर : अयोध्येतील श्रीराम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते ‘मंदिरनिर्माण से राष्ट्रनिर्माण’ असा संदेश देत १ ते १५ जानेवारीदरम्यान घरोघरी निमंत्रणाच्या अक्षता देणार आहेत. पाच लाख नोंदणीकृत मंदिरांवर रोषणाई, दहा दिवस दीपोत्सव, प्रत्येक मंदिरात रामरक्षा, रामनामाचा जप आदी कार्यक्रमही यानिमित्ताने आयोजित करण्यात येणार आहेत.

रा. स्व. संघ परिवाराच्या वतीने सेवा प्रकल्प सुरू असणाऱ्या वस्त्यांमध्ये आवर्जून निमंत्रणे दिली जाणार आहेत. त्यासाठी एक ते दीड लाख कार्यकर्ते कामाला लागले आहे. ही प्रक्रिया सुरू असतानाच मंदिर विश्वस्तांनी आपल्या मालकीच्या जागा अहिंदूंना देऊ नये, अशा सूचनाही विश्व हिंदू परिषदेने केल्या आहेत. भाव जागरणाचे असे कार्यक्रम ठरावीक अंतराने घेतले जातात. ज्यांनी अशा उपक्रमात सहभाग घेतला, त्यांना एखादे काम पूर्ण होत असताना निमंत्रण देण्याचा भाव असावा, म्हणून अक्षता घेऊन त्यांच्याशी संपर्क साधला जाणार असल्याचे विश्व हिंदू परिषदेच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

हेही वाचा >>> बीड जाळपोळीची ‘एसआयटी’ चौकशी ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधानसभेत घोषणा

विविध प्रांतांतील परिषदेच्या कार्यकर्त्यांनी अयोध्येतून आणलेल्या मंगल कलशातील अक्षता प्रत्येक जिल्हा पातळीवरील अक्षतांमध्ये मिसळून भर टाकली जाणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात त्यासाठी आवश्यकतेनुसार तांदळाच्या अक्षता तयार केल्या जात आहेत. या अक्षतांबरोबरच ‘मंदिरनिर्माण से राष्ट्रनिर्माण’ असे घोषवाक्य मगल कलशावर लिहिण्यात आले आहे.

मंदिर परिसराच्या रचनेबाबतचे ठराव 

मंदिरे सरकारी नियंत्रणापासून मुक्त असावीत, मठ-मंदिरांना व्यवस्थापनाचा अधिकार असावा, शासन दरबारी जमा झालेला पैसा हा फक्त हिंदू मंदिरांसाठीच खर्च व्हावा, हिंदू मंदिर परिसरात अहिंदूना व्यवसायबंदी असावी, मंदिरांच्या जागा अहिंदूंना भाडेकरारावर देऊ नये अथवा त्यांना विक्री करू नये. मंदिराच्या जागांवरील अतिक्रमण दूर करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने संरक्षण द्यावे, हिंदू समाज एक आहे, त्यात कोणताही भेदाभेद पाळू नये, सर्वांना पूजेचा अधिकार असावा, मोठया मंदिरांनी लहान मंदिरे दत्तक घ्यावीत अशी रचना करण्यासाठी विश्वस्तांशी चर्चा सुरू असल्याचे विश्व हिंदू परिषदेचे राजीव जहागीरदार यांनी सांगितले.

श्रीराम जन्मभूमीमध्ये मंदिर होत असल्याचा आनंद द्विगुणीत व्हावा म्हणून विविध प्रकारचे धार्मिक कार्यक्रम मंदिरांतून आयोजित करण्याचे नियोजन आहे. अक्षतेसह निमंत्रणपत्रिका देण्यासाठी देवगिरी प्रांतामध्ये एक ते दीड लाख कार्यकर्ते काम करणार आहेत.

राजीव जहागीरदार, अर्चक व पुरोहित आयाम, विश्व हिंदू परिषद

राम दर्शन सोहळयाचे प्रक्षेपण

* अयोध्येस रामदर्शनाला जाऊ न शकणाऱ्यांना आपापल्या गावात तो सोहळा पाहता यावा यासाठी त्याचे थेट प्रक्षेपण प्रत्येक मंदिरात केले जाणार आहे.

* या कालावधीमध्ये मंदिरांवर रोषणाई करण्याचे आवाहन परिषदेने केले आहे. मंदिर व्यवस्थापनात कोणत्या बाबींचा समावेश असावा, याचेही नियोजन केले जात आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

* त्याबाबतचे चार ठराव मंदिर विश्वस्तांच्या संमेलनात मांडण्यात आल्याचे विश्व हिंदू परिषदेच्या अर्चक आणि पुरोहित संपर्क आयामाचे प्रांतप्रमुख राजीव जहागीरदार यांनी सांगितले.