मराठवाडय़ातील इतर धरणांमध्ये अजूनही पुरेसा साठा नसला तरी जायकवाडी जलाशयात मात्र दररोज पाण्याची आवक वाढत आहे. रविवारी सायंकाळी धरणातील पाणीसाठा ६३.४ टक्क्यांवर पोहचला. या वर्षी ५७ एमएमसीहून अधिक पाणी नगर आणि नाशिक जिल्हय़ातून होत आहे. गेल्या बारा दिवसात जायकवाडी धरणाच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने परळी येथील औष्णिक वीज केंद्र सुरू करण्याची पाणीपुरवठा करण्याची मागणी केली जात आहे. पाणीपातळीत वाढ झाल्याने या वर्षी जायकवाडी धरणातून सिंचनासाठी आवर्तने दिली जाणार आहेत.

तीन वर्षांपासून मराठवाडय़ातील दुष्काळाने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले होते. तसेच पिण्याच्या पाण्याची चिंता दिवसागणिक वाढत होती. चांगल्या पावसामुळे स्थिती बदलत असल्यासारखे वातावरण आहे. मात्र, गोदावरी काठच्या धरणाखालच्या गावातील पिण्याच्या पाण्याची भ्रांत मिटेल, एवढाही पाऊस धरणांच्या पाणलोटात झालेला नाही. जलयुक्तशिवार योजनेमुळे नदी खोलीकरणामुळे ओढय़ात पाणी साचले आहे. पण मोठा पाऊस नसल्याने हे पाणी धरणापर्यंत गेलेच नाही. परिणामी मांजरा, सिनाकोळेगाव, माजलगाव ही धरणे कोरडीच आहेत.

तुलनेने जायकवाडीच्या पाणलोटात पाऊस झाला. तो एवढा अधिक आहे की नगर आणि नाशिक जिल्हय़ातील धरणे भरून जायकवाडीत येणारे पाणी अजूनही सुरू आहे. जायकवाडी जलाशयात २६ हजार ६०० क्युसेस वेगाने पाण्याची आवक आहे. नांदूर मधमेश्वरमधून ८ हजार ४००, नागमठाण येथून ७६००, गंगापूरमधून १४७० क्युसेक वेगाने पाणी येत आहे. याच वेगाने पाणी आले तर या वर्षी जायकवाडीवरुन या वर्षी सिंचनाला चांगले पाणी मिळू शकते. मात्र, यासाठी कालवे आणि चाऱ्यांच्या दुरुस्त्यांची कामे तातडीने हाती घ्यावी लागणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.