राज्याच्या अर्थसंकल्पात पैठणमध्ये मोसंबीची उत्पादकता व शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी लिंबूवर्गीय प्रशिक्षण, संशोधन व विस्तार केंद्राची (सिट्रस इस्टेट) घोषणा करण्यात आली. विदर्भातील संत्रा लागवडीचे क्षेत्र पाहता तेथे तीन सिट्रस इस्टेट तर पैठणमध्ये उभारण्यात येणारी ही मराठवाड्यातील एकमेव संस्था असली तरी त्यामध्ये गडगडलेला बाजारभाव स्थिरस्थावर होईपर्यंत शेतकऱ्यांना मोसंबी सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक शीतगृहाचा समावेश नाही. प्रक्रिया उद्योग आकारास येतील, याबाबतही केवळ ‘प्रयत्न’ पातळीवरच बोलले जात आहे. साखरपट्टा असलेल्या भागात मोसंबीवरील प्रक्रिया उद्योग कितपत भरभराटीस येतील, याविषयी अभ्यासकांकडून शंकाच उपस्थित केली जात आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

औरंगाबाद, जालना व बीड या तीन जिल्ह््यांच्या सीमालगतच्या पट्ट्यात मोसंबी लागवडीचे जवळपास ५० हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्यातही औरंगाबाद व जालना जिल्ह््यातील लागवड क्षेत्र हे ४५ हजार हेक्टरवर आहे. मोसंबीचे लागवड क्षेत्र पाहून पंजाबच्या लिंबूवर्गीय प्रशिक्षण, संशोधन व विस्तार केंद्राच्या (सिट्रस इस्टेट) धर्तीवर महाराष्ट्रातही चार केंद्र उभारण्यात येणार आहेत. त्यात मोसंबीसाठीचे केंद्र पैठणमध्ये तर संत्र्यांसाठी तीन केंद्र विदर्भात आहेत. यासाठी राज्याचे फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांनी पाठपुरावा केला होता.

राज्याच्या ८ मार्च रोजीच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री अजित पवार यांनी पैठणमधील सिट्रस इस्टेटसाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याची घोषणा केली. या निधीतून पैठणधील संत ज्ञानेश्वार उद्यानाजवळील तालुका फळ रोपवाटिकेच्या ठिकाणच्या ६५ एकर जागेवर प्रशासकीय इमारत, मोसंबीवरील संशोधन केंद्र, बीज चाचणी केंद्र, रोपवाटिका (मदर प्लँट्स) प्रयोगशाळा, टिश्यू कल्चर, उत्पादकता व उत्पन्न वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळावे, असे केंद्र उभारण्यात येणार आहे. याशिवाय देशभरातील मोसंबीचा दर तत्काळ पाहता यावा अशा ई-माहिती केंद्राची  व्यवस्थाही असणार आहे. मात्र, या प्रकल्पात शीतगृहाला स्थान नाही.

फळ बाजारपेठेत तेलंगणाची मोसंबी दाखल झाल्यानंतर आवक वाढल्यामुळे महाराष्ट्रातील उत्पादक शेतकऱ्यांच्या मालाला  उठाव मिळत नाही. दरातही घसरण होते. अशा वेळी महाराष्ट्रातील मोसंबी उत्पादकांना त्यांचा माल ठेवण्यासाठी शीतगृह फारसे उपलब्ध नसल्यामुळे त्यांना पडलेल्या दरातच विक्री करण्याशिवाय पर्याय राहात नाही. गतवर्षी टाळेबंदीच्या काळात पैठण, पाचोड, जालन्यातील शेतकऱ्यांना दोन ते तीन रुपये किलो एवढ्या कवडीमोल दराने मोसंबी विकावी लागली. शीतगृहात मेणाचे आवरण देऊन मोसंबी ठेवता येते. मागणी वाढल्यानंर बाजारपेठेत पुन्हा दरही चांगला मिळू शकतो. शीतगृहात माल ठेवण्यासाठी फारसा खर्चही शेतकऱ्यांना सोसावा लागत नाही.

पैठणमधील एका उद्योग समूहाच्या शीतगृहाचे दर पाहता अधिक आठ ते १८ अंश तापमानात भाज्या, फळे ठेवण्यासाठी किलोमागे ५० ते ६० पैसे महिनाभराचे आकारले जातात. तर बटर, श्रीखंड, आईसक्रीम या अतिथंड पदार्थांसाठी उणे १८ अंश तापमानात महिनाभरासाठी एक रुपया किलोचा दर आकारला जातो. २ हजार टन माल क्षमतेचे हे खासगी शीतगृह आहे. त्याच्या जोडीला सिट्रस इस्टेटअंतर्गत शीतगृह उभारणी झाली तर बाजारपेठेतील पडलेल्या दराच्या काळात मोसंबी उत्पादकाला नुकसानीचा सामना करण्याची वेळ येणार नसल्याचे अभ्यासकांचे मत आहे. तसेच मोसंबीच्या रसापासून शीतपेय तयार करण्यासाठीचा प्रक्रिया उद्योग उभारण्यात त्यातील लिनोनीन या अल्पकाळ टिकणाऱ्या घटकाची प्रमुख अडचण असली तरी आधुनिक तंत्रज्ञानाच्या आधारे प्रक्रिया उद्योग उभारले जाऊ शकतात. मात्र, त्यासाठी या भागातील साखरसम्राटांची भूमिकाही विचारात घेऊन पुढील पावले टाकले जातील, असे अभ्यासकांचे निरीक्षण आहे.

प्रकल्पस्थळाची पाहणी

पैठणमधील सिट्रस इस्टेट या नियोजित प्रकल्पाच्या ठिकाणची शुक्रवारी कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी पाहणी केली. फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे यांच्या प्रयत्नातून हा प्रकल्प आकारास येत आहे. अर्थसंकल्पात २० कोटींची तरतूद करण्यात आली. या प्रकल्पात  शीतगृह उभारणी नाही. मात्र, प्रक्रिया उद्योगनिर्मितीचा विचार आहे, असे मंत्री भुमरे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत असलेल्या अधिकारी वर्गांकडून सांगण्यात आले.

पैठणमधील केंद्रातून या भागातील मोसंबी उत्पादकांना देशभरातील बाजारभावासह इतरही अनेक प्रकारचे मार्गदर्शन मिळणार आहे. ६२ एकर जागेवर हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

– विशाल साळवे, मंडळ कृषी अधिकारी, पैठण

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: What is the benefit of citrus processing industry to paithan abn
First published on: 31-03-2021 at 00:18 IST