हिमाचल प्रदेशात बदल्यांच्या निर्णयाला विरोध

सकाळच्या व सायंकाळच्या वेळात भाजी विकतो. मधल्या वेळेत वोक्हार्ट या औषधे निर्माण करणाऱ्या कंपनीत काम करतो. सेवा २० वर्षांपासूनची आहे, पण पगार अवघा १२-१३ हजार रुपये. संसार रेटत नाही. हातभार म्हणून पत्नी आजच्या युगातही जात्यावर डाळी काढण्याचे काम करते. कंपनी आता आहे त्या पगारात काहीशी वाढ देऊन हिमाचलमधील बद्दी येथे पाठवतेय.. कसं जाणार? दिगंबर बाजीराव दानवे यांचा हा प्रश्न. ज्ञानेश्वर चिखले हेही कंपनीतील पगारातून भागत नाही म्हणून रात्री रिक्षा चालवतात. मग पूर्ण वेळ रिक्षाच का चालवत नाही, या प्रश्नावर चिखले सांगतात, मुलांवर त्यांचे वडील रिक्षाचालक आहेत हे सांगण्याची वेळ येऊ नये म्हणून. एकप्रकारे सामाजिक प्रतिष्ठा जपण्यासाठी.!  या दोघांचीच ही कहाणी नाही तर ५४ कामगारांचीच कमीअधिक प्रमाणात अशीच व्यथा आहे. त्यांनी कंपनीच्या निर्णयाविरोधात सोमवारपासून उपोषण सुरू केले आहे.

चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील वोक्हार्ट या आंतरराष्ट्रीय कंपनीने एल-१ जागेतील प्रकल्पातील कामगारांची शेंद्रा, वाळूजसह हिमाचल प्रदेशातील बद्दी येथे बदली केली आहे. कमी पगारात बदलीच्या ठिकाणी जाणे व्यावहारिकदृष्टय़ा परवडणारे नाही म्हणून आणि व्यवस्थापनाने अचानक घेतलेल्या निर्णयाविरोधात कामगारांनी आंदोलन सुरू केले आहे. त्यात अनेक महिलाही आहेत. सुनंदा रमेश गाडेकर या ३८ वर्षांपासून म्हणजे चिकलठाण्यातील प्रकल्प सुरू झाल्यापासून काम करीत आहेत. आज त्यांचा पगार १२-१५ हजारांच्या आत आहे. स्मिता सुहास जोशी यांचीही सेवा ३५ वर्षे झाली आहे. भागीरथी धोंडीराम झोरी या ३७ वर्षांपासून काम करतात. कमी पगारात एवढी वर्षे काम करण्यामागे कंपनी मोठी आहे, आज ना उद्या करारनाम्यात वाढ करून पगार वाढवेल, ही आशा आहे.. शिवाय आंतरराष्ट्रीय कंपनीत काम करतो आहोत, असे सांगण्यातही एकप्रकारची प्रतिष्ठा आहे, असे हे कामगार सांगतात. गिरीश वानोलकर म्हणाले, महिन्याकाठी माझ्या हातात सात हजार पडतात. घर भाडय़ाचे आहे. मी मूळचा नांदेडकडचा. गावाकडे जायचे-यायचे म्हटले तरी त्यात हजार-दोन हजार रुपये लागतात. मुलांना सुटीतही गावाकडे कसे पाठवायचे, असा प्रश्न असतो. कंपनीने माझी बदली हिमाचलमधील प्रकल्पात केली आहे. बदलीनंतर थोडा फार पगार वाढेल. पण एक-दोन हजारांच्या पुढे वाढ मिळणार नाही. मग एवढय़ा दूर कसे जायचे..? असाच प्रश्न दिगंबर दानवे यांचाही. दानवे यांनी सांगितले, की सुरुवातीला औरंगाबादेत व त्यानंतर आठ वर्षे दमण येथील प्रकल्पात काम केलेले आहे. तेथून पुन्हा औरंगाबादेत आलो. तेथे असलेला पगार येथे आल्यावर व्यवस्थापनाने कमी केला. मुलीचं लग्न केलं कर्ज काढून. दोन एकर शेतीवर कर्ज आहे.  घर साडेतीन हजार रुपये भाडय़ाचे आहे. २० वर्षे सेवा झाली. आता बदली केली आहे. त्या विरोधात आम्ही उपोषण सुरू केले आहे.

प्रकल्पाला टाळे नाही

कामगारांच्या उपोषणाबाबत व्यवस्थापनातील अभिजित जैन यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. कंपनीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार चिकलठाणा औद्योगिक वसाहतीतील एन-१ मधील प्रकल्पाला टाळे लावलेले नाही. केवळ कामगारांना इतर प्रकल्पात सामावून घेतले आहे. काही जणांची बदली हिमाचलमध्ये केलेली आहे. काहींची वाळूज, शेंद्रा येथील प्रकल्पात बदली केली. त्यांना जाण्या-येण्यासाठी कुठलाही खर्च नाही. कारण कंपनीचे वाहन आहे. कंपनीच्या धोरणानुसारच ही बदली केली आहे. कामगारांना त्रास देण्यासाठी काही केलेले नाही, असे सांगितले.