औरंगाबाद : न्यायालयात साक्ष देऊन परतणाऱ्या तरुणांवर कारमधून पाठलाग करत आलेल्या दुसऱ्या गटाने तलवारीने हल्ला केला. यात तीन जण जखमी केले. ही थरारक घटना गजबजलेल्या पैठणगेटजवळील सिल्लेखाना चौकात गुरुवारी दुपारी एकच्या सुमारास घडली. हल्ल्यातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाला असल्याचे पोलिसांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

परमेश्वर वाघ व नितीन प्रकाश जाधव यांच्यात वर्षभरापूर्वी शिवाजीनगर भागात भांडण झाले होते. परमेश्वर वाघ याने आपल्या साथीदारांच्या मदतीने नितीन जाधव याच्यावर हल्ला केला होता. या प्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुरुवारी न्यायालयात सुनावणी असल्यामुळे परमेश्वर वाघ हे रामेश्वर तुकाराम गवारे, शार्दुल सुरेश गावंडे यांच्यासोबत मोटारीने जिल्हा न्यायालयात आले होते. तर नितीन जाधव हा देखील आपल्या साथीदारासोबत न्यायालयात कारने आला होता.

न्यायालयात सुनावणी न होता पुढची तारीख मिळाल्यामुळे परमेश्वर वाघ हे आपल्या साथीदारासोबत मोटारीने महावीर चौक, वरद गणेश मंदिर चौक, सिल्लेखानामाग्रे जात होते. त्या वेळी मोटारीमधून पाठलाग करणाऱ्या नितीन जाधव याने परमेश्वर वाघ यांना सिल्लेखाना चौकात अडविले.

त्यानंतर आपल्याजवळील तलवारीने वाघ यांच्यावर हल्ला केला. या घटनेत परमेश्वर वाघ यांच्यासह त्यांच्यासोबत असलेले रामेश्वर गवारे, शार्दुल गावंडे हे दोघे जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच क्रांती चौक पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक राहुल सूर्यतळ, उपनिरीक्षक महादेव गायकवाड, सोनवणे यांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन जखमी झालेल्यांना उपचारासाठी घाटी रुग्णालयात हलविले. याप्रकरणी सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल नव्हता. मात्र दोन्ही गट तक्रार दाखल करण्यासाठी ठाण्यात जमा झाले होते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Youth attack after returning from court in aurangabad
First published on: 31-05-2019 at 04:17 IST