छत्रपती संभाजीनगर :अयोध्येतील श्रीराम मंदिर आरडीएक्सने उडवून द्यायचे आहे, तुला बदल्यात एक लाख रुपये मिळतील तू आम्हाला मंदिर उडवून देण्याच्या कामात मदत करणाऱ्या किमान ५० तरुणांशी जोडून दे, असा हिंदी भाषेतील एक संदेश शिरूरमधील एका तरुणाला आला असून त्याने तातडीने त्याची माहिती शिरूर पोलिसांना दिल्यानंतर याप्रकरणी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक प्रवीण जाधव यांनी दिली आहे.
आलेल्या संदेशाच्या स्थळ-काळ-वेळेवरून संदेश हा पाकिस्तानातील लाहोरचे ठिकाण मिळत असल्याची प्राथमिक माहिती समोर आल्यानंतर तक्रारदार तरुण भेदरला आहे. तक्रार नोंदवल्यानंतर तरुणाने त्याचा मोबाईल फोनही बंद करून ठेवल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.
संबंधित तरूणाच्या इन्स्टाग्राम या समाज माध्यमावरील खात्यावर हिंदी भाषेमध्येवरील संदेश अचानकपणे आला आहे. त्यामध्ये “हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्सने उडाना है, पचास बंदे चाहिये, आपके पास आरडीएक्स पहुंच जायेगा, साथ मे एक लाख रुपये भी मिल जायेंगे, लेकीन बंदे काम करने वाले चाहिये, अगर आप काम कर सकते हो तो करो, नही तो जो मंदिर उडाने का काम करने को आगे आ सकते है तो उनका नंबर हमे दे दो…असा आलेला संदेश आहे, या संदेशामुळे संबंधित तरुण भेदरलेला असून त्याने शनिवारी सायंकाळी तातडीने शिरूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदवली आहे. या तक्रारीची बीड पोलिसांनी गंभीरतेने दखल घेतली असून याप्रकरणी चौकशी सुरू करण्यात आली आहे.