प्रशासकीय यंत्रणेची अनास्था, गावपातळीवरचे राजकारण यामुळे बहुतांशी सरकारी शाळा विद्यार्थ्यांअभावी बंद पडण्याच्या मार्गावर असतानाच नवगण राजुरीच्या शाळेतील शिक्षकांनी विविध उपक्रम राबवत शाळेला रोल मॉडेलच बनवले आहे. विद्यार्थ्यांसाठी बचत बँक, भाजीपाला केंद्र, फुलपाखरू उद्यान असे उपक्रम राबवत चार वर्षांपूर्वी केवळ दीडशे विद्यार्थी संख्या असलेल्या शाळेचा पट आता तिपटीने वाढून पाचशेकडे पोहचला आहे. सेमी इंग्रजी सुरू करणारी ही पहिली शाळा आता दप्तरमुक्त होणार असून चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या हाती आता टॅब दिसणार आहे. भौतिक सुविधांबरोबर गुणवत्ताही साधणारी ही शाळा इतर शिक्षकांसाठी आदर्श ठरली आहे.
बीड तालुक्यातील नवगण राजुरी हे स्व. केशरबाई क्षीरसागर आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांचे गाव. ग्रामपंचायतीसह जिल्ह्यातील बहुतांशी सत्तास्थाने वर्षांनुवष्रे क्षीरसागर कुटुंबीयांच्या ताब्यात. असे असले तरी नवगण राजुरीतील जिल्हा परिषदेच्या शाळेची अवस्था इतर सरकारी शाळेसारखीच. चार वर्षांपूर्वी केवळ १७० विद्यार्थी संख्या असलेली ही केंद्रीय प्राथमिक शाळा आज जिल्ह्याची रोल मॉडेल बनली ती सभापती संदीप क्षीरसागर यांच्या संकल्पनेतून. शिक्षण सभापतिपदाची जबाबदारी आल्यानंतर त्यांनी सरकारी शाळेच्या परिवर्तनाला गावातून सुरुवात केली. शिक्षकांना पाठबळ दिल्यानंतर या शाळेत नवीन नवीन उपक्रम राबवण्यास सुरुवात झाली. शिक्षकांना राजकीय पाठबळ मिळाल्यानंतर त्यांनीही आपल्यातील क्षमता दाखवत शाळेचे रुपडे पालटले. चौथीपर्यंत असलेल्या या शाळेला सुसज्ज इमारतीसह इतर भौतिक सुविधा निर्माण केल्यानंतर या शाळेत आजूबाजूच्या काकडहिरा, निरगुडी, शिरापूर धुमाळ, वंजारवाडी, तिप्पटवाडी, कारखाना, काटवटवाडी, बेलुरा, हिवरिशगा, खालापुरी या गावातून विद्यार्थ्यांचा ओघ सुरू झाला. खासगी इंग्रजी शाळेलाही लाजवेल अशा पद्धतीने व्यवस्थापन आणि सेमी इंग्लिश सुरू केल्यानंतर या शाळेत प्रवेश मिळवण्यासाठी पालकांची धडपड सुरू झाली. अवघ्या चार वषार्ंत तब्बल पाचशे विद्यार्थ्यांपर्यंत संख्या पोहोचली असून गुणवत्तेतही शाळेने आपला ठसा उमटवला आहे. चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्ह्यातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय येण्याचा मान याच शाळेतील मुलांनी मिळवला.
शिक्षकांनी शाळेत मुलांमध्ये वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने वाचनालय सुरू केले. अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतर पुस्तके वाचन करण्याची मुलांमध्ये रुची निर्माण केली. शिक्षक-विद्यार्थ्यांच्या वाढदिवसाला चॉकलेट वाटण्याची परंपरा बंद करून पुस्तक खरेदी करून वाचनालयात ठेवण्याचा पायंडा सुरू केला, तर शालेय पोषण आहारासाठी स्वतंत्र सहा लक्ष रुपये खर्च करून अद्ययावत स्वयंपाक घर बांधण्यात आले. शाळेच्या छतावरून पडणारे पावसाचे पाणी वाया जाऊ नये म्हणून यासाठी जलपुनर्भरण करणारी ही जिल्ह्यातील एकमेव शाळा. आधुनिकतेच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांसाठी अद्ययावत संगणक कक्ष आणि लोकसहभागातून डिजिटल वर्ग सुरू करण्यात आला आहे. भाजीपाला उत्पादन केंद्र, फुलपाखरू उद्यान निर्माण करून मुलांमध्ये निसर्गाविषयीच्या गोडीचे बीजारोपण केले जात आहे. आता या शाळेने दप्तर मुक्तीचा संकल्प सोडला असून पालकांच्या बठकीतच शिक्षकांनी हा प्रस्ताव ठेवल्यानंतर पुढील शैक्षणिक वर्षांपासून बहुतांशी पालकांनी आपल्या मुलांना टॅब घेऊन देण्याची तयारी दर्शवली.
पाठवला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th Oct 2015 रोजी प्रकाशित
नवगण राजुरी जिल्हा परिषद शाळेचा ‘दप्तर मुक्ती’ संकल्प!
सेमी इंग्रजी सुरू करणारी ही पहिली शाळा आता दप्तरमुक्त होणार असून चौथी पर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या हाती आता टॅब दिसणार आहे.
Written by दया ठोंबरे

First published on: 26-10-2015 at 01:54 IST
Aurangabad News (छत्रपती संभाजीनगर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Zp school determination school bag free