अलिशान घरापेक्षा वापरलेली गाडी महाग आहे, असं जर तुम्हाला कुणी सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. मात्र तुम्ही वाचलेली बातमी खरी आहे. पाच वर्ष वापरलेली टोयोटा लँड क्रुझर गाडीची किंमत २.३४ कोटी रुपये आहे. तर दहा वर्षे वापरलेल्या जुन्या फियाट गाडीची किंमत ६.१७ कोटी रुपये आहे. तुम्ही वाचत असलेल्या किंमती अगदी बरोबर आहेत. भारताच्या शेजारील श्रीलंकेतील ही स्थिती आहे. कारण देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर असून महागाई वाढली आहे. सरकारने देशात आर्थिक स्थिती सुधारण्यासाठई सर्व अनावश्यक आयातीवर निर्बंध घातले आहे. नवीन मॉडेल्सची आयात रोखून धरल्याने गाड्यांची मागणी वाढली आहे. त्यामुळे वापरलेल्या गाड्यांच्या किंमती कितीतरी पटीने वाढल्या आहेत.
न्यूज एजन्सी एएफपीच्या वृत्तानुसार, वैयक्तिक वाहनाच्या शोधात असलेल्या श्रीलंकन लोकं वापरलेल्या कारच्या पर्यायाकडे पाहात आहेत. मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे किंमती वाढल्या आहेत. काही मॉडेल्सच्या किंमती देशातील प्रीमियम परिसरातील घरापेक्षाही जास्त आहे. एका अहवालानुसार, अलीकडच्या काळात मागणी आणि किंमती दोन्ही वाढल्या आहेत. २०२१ च्या सुरुवातीला ज्याने वाहन खरेदी केले असेल त्यांच्यासाठी आता पुनर्विक्री मूल्य लक्षात घेता ही एक अतिशय मौल्यवान गुंतवणूक असू शकते.
श्रीलंकेत कार उत्पादन होत नाही. त्यामुळे खरेदीदार नेहमीच आयात केलेल्या उत्पादनांवर अवलंबून असतात. देशाची आर्थिक स्थिती पाहता नव्या गाड्या आयात केल्या जाणार नाही. त्यात वापरलेल्या गाड्यांचा मर्यादित साठा आहे. त्यामुळे या गाड्यांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार, कोविडच्या सुरुवातीपासून श्रीलंकेत पाच लाख लोक दारिद्र्य रेषेखाली गेले आहेत. डिसेंबरमध्ये खाद्यपदार्थ २२.१ टक्क्यांनी महागले आहेत.श्रीलंकेतील विरोधी पक्षाचे खासदार आणि अर्थतज्ज्ञ हर्ष डिसिल्वा यांनीही याबाबत भीती व्यक्त केली आहे. श्रीलंकेची परकीय चलनाची गंगाजळी रिकामी असून कर्ज वाढत असल्याचे त्यांनी संसदेत सांगितले.