ड्रिंक अँड ड्राइव्ह म्हणजे मद्यपानकरून गाडी चालवल्याने दरवर्षी अनेक अपघात होतात. यामुळे दरवर्षी शेकडो लोकांचा मृत्यू होतो. खरंतर मद्यपान करून गाडी चालवणे हा बऱ्याच देशांमध्ये गुन्हा आहे. असे केल्यास शिक्षा होऊ शकते, हे माहित असुनही मद्यपान करून गाडी चालवणाऱ्यांची संख्या कमी होत नाहीये. म्हणून यावर आता एक नवीन उपाय करण्यात येणार आहे. काय आहे हा उपाय आणि कोणकोणत्या देशात लागु होणार आहे जाणून घेऊया.

सध्या अमेरिकेमध्ये एका अशा टेक्नॉलॉजीवर काम सुरू आहे ज्याच्यामदतीने मद्यपान करून गाडी चालवणाऱ्या व्यक्तीला ओळखता येणार आहे. या टेक्नॉलॉजीला अल्कोहल इम्पेयरमेंट डिटेक्शन सिस्टम असे नाव देण्यात आले आहे. ही सिस्टिम कारमध्येच बसवण्यात येणार आहे.

आणखी वाचा : कारच्या मागच्या सीटवर बसणाऱ्यांनी सीटबेल्ट लावला नाही तर वाजणार अलार्म; केंद्र सरकार आणणार नवा नियम

अशाप्रकारे काम करणार हे सिस्टिम

या सिस्टिमद्वारे ड्रायव्हरच्या चेहऱ्यावर सतत लक्ष ठेवले जाते. ड्रायव्हरला अलर्ट ठेवण्यासाठी ड्रायव्हर डिटेक्शन सिस्टीम जशी काम करते त्याच पद्धतीने ही सिस्टिम काम करते. ड्रायव्हर मद्यपान करून गाडी चालवायला बसला तर लगेच अलार्म वाजू लागतो, ज्यामुळे इतरांना या गोष्टीची कल्पना येण्यास मदत होईल. मात्र ही यंत्रणा अद्याप पूर्णपणे विकसित झालेली नाही, यावर काम सुरू आहे.

अनेकांचे जीव वाचवण्यास करेल मदत
यूएस नॅशनल ट्रान्सपोर्टेशन सेफ्टी बोर्ड (NTSB) ने कार निर्मात्यांना ही सेफ्टी फिचर सर्व वाहनांमध्ये स्टॅंडर्ड स्वरूपात देण्यास सांगितले आहे. अशा आधुनिक तंत्रज्ञानामुळे अनेक अपघात टाळता येतील आणि अनेकांचे प्राण वाचवता येतील असा एनटीएसबीचा विश्वास आहे.