कोणालाही काहीही बोलण्याचा अधिकार आहे की नाही? कोणालाही काहीही लिहिण्याचा अधिकार आहे की नाही? कोणालाही स्वत:च्या मनाला येईल तसे कपडे घालण्याचा अधिकार आहे की नाही? कोणालाही वाटेल ते मत बाळगण्याचा अधिकार आहे की नाही?..

या सगळ्या प्रश्नांची माझी उत्तरे ही ‘हो’ अशी आहेत. कोणी काही व्यक्त केले तर ज्यांच्या भावना दुखावल्या जातात ते मला अगदीच अडाणी वाटतात. आता इतके खोऱ्याने लोक जगात राहतात, त्यांचे मेंदू इतक्या विविध विषयांवर विचार करत बसलेले असतात. त्यातल्या एखाद्याने जर काही विचार मांडले, तर त्याच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष करायचा पर्याय खुला असतोच. जर आपल्याकडे थोडा वेळ असेल आणि आपलेही डोके चालत असेल तर आपण त्याचा युक्तिवादही करू शकतो. पण असले काहीही न करता भावना दुखावल्या जाऊन जे रुसून बसतात आणि त्यातले काही तर मांडणाऱ्याशी मारामारी करतात, हे मला अगदीच विनोदी वाटते. जग इतके प्रगत झाले, नवनवीन शोध लागले, मोठमोठय़ा रोगांवर आपण विजय मिळवला, पण भावना दुखावल्या जाण्याच्या विकारावर आपल्याला अद्यापही विजय मिळवता आला नाही, हे आश्चर्याचेच आहे.

Prime Minister Modi asserted that the gaming industry does not need regulation
‘गेमिंग उद्याोगा’ला नियमनाची गरज नाही! पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन; आघाडीच्या गेमर्सशी संवाद
balmaifal, symbol of revolution, dr ambedkar balmaifal
बालमैफल: क्रांतीचे प्रतीक
arjun meghwal
साहित्य अकादमीच्या स्वायत्ततेवर पुन्हा प्रश्नचिन्ह; केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीवर आक्षेप, सी. राधाकृष्णन यांचा सदस्यपदाचा राजीनामा
loksatta readers, feedback, comments , editorial
लोकमानस: ताठरही नाही की तडजोडवादी नाही.. वंचित बहुजन आघाडी तर संधीवादी!

सुरुवातीलाच स्पष्ट करतो, की मी गेली अनेक वर्षे निर्विवाद अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कर्ता आहे. कोणालाही काहीही बोलण्याचा, वाटेल तसे कपडे घालण्याचा अधिकार आहे असे मी मानतो. ज्याला जे बोलायचे असेल त्याने ते बोलले पाहिजे, त्यामुळे कोणाच्या भावना, श्रद्धा दुखावल्या जाणार असतील तरी बोलले पाहिजे असे मी मानतो. आणि मग जर कोणी त्या माणसाला काहीतरी व्यक्त केले किंवा मांडले म्हणून शिक्षा देत असेल तर मी त्याची निंदा करतो. मूर्खालाही व्यक्त व्हायची पूर्ण संधी- हे मला सभ्य संस्कृतीचे लक्षण वाटते. माणूस जेव्हा संपूर्ण नवीन, वेगळा विचार करत असतो तेव्हा अनेकदा प्रस्थापित लोकांना ते अजिबात समजत नाही आणि त्यामुळे आवडतही नाही. त्यामुळे कितीही वेडेपणाचे वाटले तरी काहीतरी नवीन हे अशा वेडय़ा लोकांकडून मांडले जात असते आणि त्यामुळेच त्यांचा तो मांडण्याचा अधिकार आणि स्वातंत्र्य मला फार महत्त्वाचे वाटते. त्यामुळेच कलावंताचे आणि खरे तर प्रत्येकाचेच अभिव्यक्तिस्वातंत्र्य हे मला मोठेच मूल्य वाटत आले आहे.

परिचयाचा एक द्रष्टा माणूस, ज्याला खूप लांबवरचे दिसते असा माझा समज होता, तो पायाखालचा खड्डा न दिसल्याने खड्डय़ात पडला तेव्हा मला फारच फसवले गेल्यासारखे वाटले. ज्या घोडय़ावर आपण रेसमध्ये पैसे लावलेत तो धावणे तर दूर, पण आधीच त्याने न धावता बसूनच घेतले की जसे वाटेल तशीच भावना मनामध्ये निर्माण झाली. हा धावायचे सोडून बसून घेतलेला घोडा म्हणजे कलावंतांचे, तंत्रज्ञांचे किंवा निर्मिकाचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य आहे की काय या विचारात मी सध्या पडलो आहे.

मी अभिव्यक्तिस्वातंत्र्याबद्दल विचार करायला लागलो तो काळ साधारण तेव्हाचा आहे; जेव्हा दीपा मेहता यांचा ‘फायर’ चित्रपट बनत होता आणि त्यावर बंदी आणायची मागणी केली जात होती. हुसेनची चित्रे फाडायची भाषा केली जात होती, तस्लिमा नसरीनना हाकलवून दिले होते, पत्रकारांना साधारण दर महिन्याला कोणी ना कोणी मारहाण करीत होता. आणि तेंडुलकर फायनल करवादलेले होते. कानपूरच्या कोणत्यातरी कॉलेजने मुलींसाठी पूर्ण कपडय़ात येणे सक्तीचे केले होते. आणि मुख्य म्हणजे मी ओशो वाचायला लागलो होतो. ओशोंना जाऊन जवळजवळ १२/१३ वर्षे झाली होती. ओशोंना अनेक देशांनी धोकादायक विचार मांडतात म्हणून विसा नाकारणे, त्यांच्या आश्रमाची सैन्य बोलावून तोडफोड करणे आणि तरीही त्यांनी आपले विचार मांडतच राहणे मी वाचले होते आणि हे मला थरारक वाटत होते. इंटरनेट साधारण त्याच काळात आले.

इंटरनेटचे आगमन ज्यांना पाहायला मिळाले त्या नशीबवान लोकांपैकी आपण एक आहोत याचा मला फार आनंद होतो. तेव्हा सगळे जण याहू वापरायचे आणि माझ्यासारख्या तेव्हा कॉलेजमध्ये असणाऱ्या सगळ्यांचाच असा समज होता, की देशा परदेशातल्या हिरो- हिरोईनचे वाट्टेल तसे फोटो पाहायला मिळावेत म्हणूनच इंटरनेटची स्थापना झाली असावी. तेव्हा – जेव्हा इंटरनेट कशासाठी आले आहे याबद्दल सगळ्यांच्याच मनात गोंधळ होते; तेव्हा मी एका मैत्रिणीला तिचा याहू आयडी विचारला तर तिने मला ‘मी नाही असले घाणेरडे धंदे करत’ असे उत्तर दिले होते. तुम्हाला आठवत असेल खूप सारे पॉर्न मटेरिअल तेव्हा वेबवर असायचे आणि आपली सगळी ओळख लपवून त्याचा आस्वाद घेता यायचा. सायबर कॅफेमध्ये पडदे लाऊन आडोसा केलेला असायचा आणि अशाच जागांना सर्वाधिक गर्दी व्हायची. हे सगळे बघायची लोकांची भूक शतकानुशतके दडपली गेली आहे, त्यामुळे पहिली संधी मिळताच लोक त्यावर तुटून पडले. मला हा सगळाच प्रवास मनसोक्त व्यक्त होण्याच्या दिशेने टाकलेले एक दमदार पाऊल वाटले. इंटरनेटमुळे आजवर जे बोलले गेले नाही ते बोलले जाईल, जे ऐकले नाही ते ऐकायला मिळेल, जे पाहिले नाही ते पाहायला मिळेल, माणसे अधिक मोकळी होतील आणि ‘संपूर्ण अभिव्यक्तिस्वातंत्र्य’ सुफळ साकार होईल, असा मला विश्वास होता.

तेव्हा एखाद्याने काही लिहिले तर छापणारा मीडिया फारच मर्यादित होता. एखाद्या मीडियापर्यंत तुम्ही पोहोचलात तर तो मीडियाही फार कमी लोकांपर्यंत पोहोचायचा. मला असे वाटायचे, की प्रस्थापित मीडिया नवीन काही लिहिणाऱ्यांचे विचार दडपून टाकते. खूप जणांना बाहेर मोकळ्या जगात यायचे होते, पण बाहेर पडायचे दरवाजे फारच अरुंद होते. इंटरनेटमुळे हे दडपलेले बाहेर येईल, ज्याला जे बोलायचे, जे मांडायचे, जसेही मांडायचेय ते आता मांडता येईल याची मला भाबडी आशा होती. एखाद्याला जर कोणत्याही कारणाने आपली ओळख लपवायची असेल तर तेही शक्य होईल, पण त्याचे विचार मात्र लोकांपर्यंत जातीलच. मला हा विश्वास होता, की आता असे खूप सारे बाहेर येईल जे आजपर्यंत दडपले होते. आजपर्यंत माध्यम नव्हते म्हणून घुसमटलेले सगळे पाणी वाहते होईल. मी फार आशा लावून होतो, पण आता आताशा मला थोडे हताश व्हायला होते. इंटरनेटने मांडणी करायचे संपूर्ण स्वातंत्र्य तर दिले, सुरक्षितताही दिली; पण आपल्याकडे मांडायलाच फार काही वेगळे नाही की काय? अशी भीती मला वाटायला लागली आहे.

आज जेव्हा संपूर्ण स्वातंत्र्य मिळाले तेव्हाची आमची अभिव्यक्ती काय आहे?

अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आग्रह धरणाऱ्यांना लैंगिक आयुष्यातला खुलेपणा, देवदेवता आणि सामाजिक – राजकीय नेत्यांचे खाजगी आयुष्य, धर्म, जात, देशभक्ती या संकल्पना या सगळ्याबद्दल मोकळेपणाने मांडायचे होते. हे मांडायला विरोध करणाऱ्या लोकांबद्दल त्यांचे आक्षेप होते. देवदेवता, नेते, देश, धर्म, कपडे, जात, नातेसंबंध या सगळ्यांबद्दल त्यांना बाजूने किंवा विरोधात असेल, पण बोलायचे होते. या सगळ्याचे काय झाले? आज निदान इंटरनेटच्या आभासी जगात तरी संपूर्ण स्वातंत्र्य आहे, पण दुर्दैवाने संपूर्ण नवे, धाडसी फार कमी तिथे वाचायला मिळते. मला कुंभार आणि गाढवाची गोष्ट आठवते. एक कुंभार रोज एका विशिष्ट झाडाला आपल्या गाढवाला रात्री बांधून ठेवायचा. त्या गाढवाला त्याची सवय झाली, नंतर नंतर तो रोज त्या गाढवाच्या गळ्याभोवती फक्त रिकामा हात फिरवायचा आणि गाढवाला वाटायचे की आपल्या गळ्यात दोरी आहेच आणि तो रात्रभर  त्या झाडाभोवतीच फिरत राहायचा. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचा आग्रह धरणाऱ्यांची अवस्था त्या गाढवासारखी झाली आहे. आपल्याभोवती आता दोर नाही हे त्यांना कळतच नाहीये, एक तर हे तरी खरे असावे किंवा तेव्हा जे गळचेपी होतेय म्हणून ओरडा करत होते, त्यांच्याकडे मुळात फक्त ओरडाच होता आणि मांडायला काहीच स्टफ नव्हता, हे तरी खरे असावे.

आज काहीही विशेष नवे वाचायला मिळत नाही. लोकांना काही संपूर्ण नवे सुचणेही कमी झाले की काय अशी मला भीती वाटते. कट पेस्ट करणारे विचारवंत गावगन्ना दिसतात आणि गुगलवरच्या शहाण्यांना द्रष्टे म्हणून मान्यता मिळताना मी पाहतो. या सगळ्या गोंधळात संपूर्ण अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे काय झाले? सूर्य उगवला, आरवणारे कोंबडे कुठे आहेत? असले विचार मनात यायला लागतात आणि जेव्हा हताश व्हायला होते तेव्हा मी माझ्या विचारांना पुन्हा आठवतो, माझ्या धारणांना पुन्हा तपासतो, मूर्खानाही सुरक्षितपणे पूर्ण व्यक्त होण्याचे स्वातंत्र्य म्हणजे खरे अभिव्यक्तिस्वातंत्र्य!!!

मला प्रस्थापित विचारवंतांकडून जराही अपेक्षा नाही; पण संपूर्ण नवे, धाडसी काहीतरी मूर्खाकडून प्रगट होईल या आशेवर मी अजूनही आहे. आणि बाय द वे मीही अजून जहाज सोडलेले नाही!

मंदार भारदे mandarbharde@gmail.com