मागच्या भागात आपण काय शिकलो ते आठवतंय ना? आपण प्रोग्राम वापरणाऱ्या व्यक्तीचं- म्हणजेच युजर (user) चं नाव इनपुट (input) घेऊन, त्या युजरला त्याच्या नावाने हॅलो म्हटलं होतं. हे करताना, आपण ते नाव x नावाच्या एका व्हेरिएबलमधे (variable) साठवून ठेवलं होतं. प्रोग्राममधील व्हेरिएबलचा वापर कसा असतो, हे आपण या आणि यापुढील काही भागांमधून समजून घेऊ. अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर हे बीजगणितातल्या ७ सारखं असतं. त्या x ची जशी एखादी किंमत असते, तशी या व्हेरिएबलचीही एखादी किंमत असते.

व्हेरिएबलच्या वापरातील पहिला टप्पा आहे डिक्लरेशन (declaration) चा. एखादं व्हेरिएबल वापरायच्या आधी आपल्याला त्या प्रोग्रामला सांगायला तर हवं, की आपण अमुक एका नावाचं व्हेरिएबल वापरणार आहोत. म्हणजे काही काही गणितात नाही का, गणिताच्या सुरुवातीलाच ‘आयताची लांबी x  मानू’ असं लिहून गणित सोडवायला सुरुवात करतो, तसं.

मागच्या भागातील उदाहरणात आपण x  नावाचं व्हेरिएबल वापरलं होतं.

आपल्या लुटूपुटूच्या ब्लॉकली (Blockly) या भाषेत आपण जेव्हा व्हेरिएबलचा x  नावाचा ठोकळा वापरला, तेव्हा त्याच्यासाठी जावास्क्रिप्ट (JavaScript) या भाषेत “५ं१ x ;” अशी कमांड वापरली गेली. हे त्या व्हेरिएबलचं डिक्लरेशन. या डिक्लरेशनच्या कमांडचं काम काय? जेव्हा आपण हा प्रोग्राम चालवून बघू (म्हणजेच execute / run करू) तेव्हा या कमांडनुसार कम्प्युटर त्याच्या मेमरी (memory) मधे एक जागा राखून ठेवेल नि त्या जागेला आपण दिलेलं नाव देईल. प्रोग्रामच्या पुढील भागात जेव्हा आपण त्या नावाच्या व्हेरिएबलमधे काही माहिती साठवायला जाऊ, तेव्हा ती मेमरीमधील त्या राखून ठेवेलेल्या भागात साठवली जाईल. आपल्या उदाहरणात, युजरचं नाव साठवण्यासाठी, आधी मेमरीमधील एक भाग x  या नावाने राखून ठेवला जाईल. नंतर युजरने त्याचं नाव इनपुट केल्यावर ते नाव या x  नावाने राखून ठेवलेल्या मेमरीच्या भागात लिहून ठेवलं जाईल.

व्हेरिएबल डिक्लरेशनबद्दल आणखी माहिती द्यायची आहे; पण ती पुढच्या भागांत!

अपर्णा मोडक sudomu@gmail.com

(या सदरातील उदाहरणं http://www.codingbasics.omsw.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध असतील.)