News Flash

पाहुणा बाप्पा

गेल्या रविवारची गोष्ट.. ‘‘आज्जी २२, माझा गणपती बाप्पा!’’ सोसायटीत मैत्रिणींच्या घोळक्यामध्ये बसलेल्या आपल्या आजीजवळ जाऊन रिद्धी जोरात म्हणाली. रिद्धीच्या दोन्ही हातांमध्ये एक लहानसा गणपती होता,

पाहुणा बाप्पा

गेल्या रविवारची गोष्ट..
‘‘आज्जी २२, माझा गणपती बाप्पा!’’ सोसायटीत मैत्रिणींच्या घोळक्यामध्ये बसलेल्या आपल्या आजीजवळ जाऊन रिद्धी जोरात म्हणाली. रिद्धीच्या दोन्ही हातांमध्ये एक लहानसा गणपती होता, मातीपासून बनवलेला.
‘‘रिद्धी, तू बनवलास?’’ आजीच्या एका मैत्रिणीने आश्चर्याने विचारलं. रिद्धीने हसून होकारार्थी मान डोलावली.
‘‘अहो, ते ‘के’ बििल्डगमधले डिसोझा आहेत नं, ते दरवर्षी गणेश चतुर्थीच्या आधी आठवडाभर सोसायटीच्या ऑफिसमध्ये मुलांसाठी गणपती बनवण्याचे मोफत वर्कशॉप्स घेतात. यावर्षी आमची रिद्धीही तिथे जातेय शिकायला. तिला बाई भारी आवड आहे गणपतीची.’’ आजीने खुलासा केला.
‘‘डिसोझांच्या घरी त्यांनी साकारलेल्या अनेक प्रकारच्या गणपतीच्या, ख्रिस्ताच्या, बुद्धाच्या मूर्ती आहेत. ते ग्लास-वर्कमधूनही फार सुंदर मूर्ती घडवतात म्हणे. अर्थात, मूर्तिकारच आहेत ते! आमच्या सियाचे आजोबा सांगत होते. त्यांचे मित्र नं डिसोझा!’’ आजीची दुसरी मैत्रीण म्हणाली.
‘‘एकदम मस्त हं रिद्धी!’’ बाकावर बसलेली अजून एक आजी हाताने ‘छान’ अशी खूण करत म्हणाली.
‘‘आज्जी, घरी चल नं गं लवकर!’’ रिद्धी म्हणाली. आजीही सगळ्या जणींचा निरोप घेऊन लगेचच उठली. तिने तिच्या पर्समधून स्वच्छ रुमाल काढून रिद्धीच्या गणपतीला झाकलं.
‘‘हे काय आज्जी?’’
‘‘अगं, आपण आपल्या बाप्पाला घरी कसं आणतो दरवर्षी? विसरलीस?’’
‘‘हां! ते ग्रीन आणि गोल्डन कापड ठेऊन नं?’’
‘‘तो खण आहे माझा!’’ आजी हसत म्हणाली. दोघी गप्पा मारत घरी आल्या.
‘‘बघितला का आमचा गणपती बाप्पा?’’ घरात शिरताना आजी म्हणाली. घरी अर्थात सगळ्यांना माहीत होतंच. आईने हॉलमधलं स्टूल पटकन पुसून घेतलं आणि रिद्धीने अलगद तिच्या गणपती बाप्पाला स्टुलावर ठेवलं. आजीने रुमाल बाजूला केला.
‘‘रिद्धी, मस्त बनवलाय बाप्पा.’’ बाबा रिद्धीला हाय-फाइव्ह देत म्हणाले.
‘‘पहिला प्रयत्न एकदम झक्कास बेटा.’’ आई कौतुकाने म्हणाली.
‘‘बबडू, पण बनवलास कसा तुझा गणपती?’’ आजोबांनी विचारलं. रिद्धी हसली. तिला ठाऊक होतं की आजोबा हा प्रश्न नक्की विचारणार!
‘‘आधी प्रॅक्टिस केली. म्हणजे माती कशी मिक्स करायची, गोळे कसे बनवायचे वगैरे. मग गणपतीच्या पोटासाठी एक मोठ्ठा गोळा केला, चेहऱ्यासाठी आणि मूर्तीच्या बेसकरिता थोडे दोन लहान गोळे बनवले. अजून छोटे गोळे हात, पाय, कान आणि सोंडेकरिता बनवले.’’
‘‘पोटासाठी मोठा गोळा का गं?’’ आईने मिश्कीलपणे विचारलं.
‘‘मग? लंबोदर आहे नं तो! नुसता मोदकच तर खात असतो.’’ रिद्धी म्हणाली. त्यावर सगळे हसले.
‘‘पुढे?’’ आजोबांना उत्सुकता होती.
‘‘काकांनी सांगितल्याप्रमाणे मग आम्ही ते गोळे एकमेकांवर बसवून त्यांना आकार दिला. हात आणि पायांच्या गोळ्यांना लांबट आकार देऊन ते थोडे दुमडून लावले. दोन गोळे थोडे चपटे करून कान चिकटवले. सोंड बनवली. डोळे कोरले आणि मग काकांनी दिलेल्या रंगांनी बाप्पाला रंगवलं.’’
‘‘अरे व्वा. मस्त मस्त!’’ आजी म्हणाली.
‘‘काय मग? आपल्याकडे येणाऱ्या बाप्पाबरोबर रिद्धीचापण बाप्पा बसवायचा नं या वर्षी?’’ आजोबांनी विचारलं. हे ऐकून तर रिद्धीचे डोळे एकदम चमकले. आहाहा! यावर्षी घरी येणाऱ्या बाप्पाबरोबर आता तिने स्वत: बनवलेला बाप्पादेखील बसणार होता. त्यामुळे रिद्धी आनंदाने उडय़ा मारू लागली..
०**
गणेश चतुर्थीला रिद्धीच्या घरी बाप्पांचं आगमन झालं. मोठय़ा बाप्पाजवळच रिद्धीचाही बाप्पा विराजमान झाला. यावर्षी रिद्धीने तिच्या गणपतीसाठी लहानशी आरास केली होती. बाबांनी जसं कागदापासून मोठय़ा बाप्पाकरिता मखर बनवलं, तसंच तिच्याही बाप्पाकरिता रिद्धीने बाबांच्या मदतीने कागदाचं मखर बनवलं होतं. तिला यावर्षी शाळेत क्राफ्ट पीरेडमध्ये शिक्षकांनी कागदाच्या पट्टय़ांपासून गोळे बनवून, ते एकात एक अडकवून माळ बनवायला शिकवलं होतं. तिने बाप्पासाठी सोनेरी कागदाची तशी कंठी बनवली होती. त्याचबरोबर हिरव्या कागदापासून दुर्वा आणि लाल कागदापासून फूल बनवायला तिला बाबांनी शिकवलं होतं.
या सगळ्यांमुळे तिचा बाप्पा खूप सुरेख दिसत होता. घरच्या गणपतीच्या दर्शनाला जो येई तो तिच्या बाप्पाचंही आवर्जून कौतुक करत होता. त्यामुळे स्वारी भलतीच खुशीत होती. त्यात काल गौरींचं आगमन झाल्यामुळे दिवसभर भरपूर नातेवाईकही आले होते. गौरींना सजवताना, घरात नाचवताना रिद्धीला खूपच धम्माल आली होती. रिद्धीच्या आईच्या आणि आजीच्या काही मैत्रिणी आल्या होत्या. तिच्याही मित्र-मैत्रिणींना तिने बोलावलं होतं. बाबांचे आणि आजोबांचेही मित्र संध्याकाळी दर्शनाला आले होते. सगळेच तिने बनवलेल्या गणपती बाप्पाचं भरभरून कौतुक करत होते.
रात्री मात्र सगळी मंडळी गेल्यावर रिद्धी बाप्पाला न्याहाळत, खट्टू होऊन सोफ्यावर बसली होती. तिला एका गोष्टीचं खूपच वाईट वाटत होतं. ‘‘गौरी जेवण झालं की परवा बाप्पा जाणार! इतक्या लग्गेच? आत्ता तर आला होता तो!’’
‘‘बाबा, आपण जास्त दिवस का नाही आणत बाप्पाला?’’ ती हळूच म्हणाली.
‘‘म्हणजे गं किती?’’ बाबा हसत म्हणाले.
‘‘दहा दिवस?’’
‘‘अगं बाळा, असं कधी असतं का? इतकी र्वष आपल्या बाप्पाचं विसर्जन गौरींबरोबरच होतं की नाही? मग असं एकदम कसं बदलायचं? आणि दहा दिवसांनीसुद्धा तुला पुन्हा हेच वाटणार की नाही?’’
‘‘मग मी बनवलेल्या बाप्पाचंही आपण विसर्जन करायचं?’’
‘‘का गं?’’
‘‘मला नाही करायचं त्याचं विसर्जन. मी एवढा छान बनवलेला गणपती बाप्पा असाच कसा विसर्जन करायचा?’’ रिद्धीच्या गालांवर टचकन पाणी ओघळलं.
‘‘आपण त्याला शो-केसमध्ये ठेऊन द्यायचं का? म्हणजे तो मला दररोज दिसेल.’’ ती हुंदका देत म्हणाली. बाबांनी तिचे डोळे पुसले आणि तिला शांत केलं.
‘‘ए वेडाबाई, मुळीच रडायचं नाही. अगं, दरवर्षी आपण जो गणपती विसर्जन करतो, तोही कुण्या कारागिराने बनवलेलाच असतो की!’’
‘‘कारागीर म्हणजे कोण, बाबा?’’
‘‘म्हणजे गणपती बनवणारे काका. आपण काही दिवसांपूर्वी गणपती बनवायचा कारखाना पाहायला गेलो होतो नं? तिथे जे काका गणपती बनवत होते, रंगवत होते, ते कारागीर! ते जो बाप्पा बनवतात तो आपण घरी आणतो दरवर्षी.’’
‘‘मग त्यांनाही वाईट वाटत असेल नं?’’
‘‘हो. पण ते थांबून राहत नाहीत. आता यावर्षीचा दसऱ्याचा सण झाला, की ते पुन्हा नव्याने बाप्पा बनवायच्या तयारीला लागतील, पुढल्या वर्षीच्या गणपतीसाठी!’’
‘‘बाबा, म्हणजे आता मीपण कारागीर झाले?’’
‘‘हो, मग!’’ बाबा रिद्धीला टाळी देत म्हणाले. इतक्यात आईने स्वयंपाकघरातून रिद्धीला हाक मारली. रिद्धी आतमध्ये पळाली. आजोबा दुर्वा निवडत दोघांमधली ही चर्चा ऐकत होते.
‘‘आबा, रिद्धीचा गणपती विसर्जन नको नं हो करायला? तो काही आपण देव म्हणून बसवला नाहीये’’, रिद्धीच्या बाबांनी आजोबांना सांगितलं.
‘‘हरकत काहीच नाही. पण तिलाही समजू देत जरा की गणपतीचं विसर्जन का करतात ते!’’
‘‘आबा, दुसरीतल्या मुलीला कसं समजावणार आहात तुम्ही हे?’’ बाबा म्हणाले. इतक्यात उकडीचा मोदक खात खात रिद्धी पुन्हा हॉलमध्ये आली.
‘‘रिद्धी, आपल्या देवघरातही गणपती बाप्पा आहे नं?’’ आजोबांनी विचारलं.
‘‘हो!’’
‘‘त्याचं आपण विसर्जन करतो का कधी? नाही नं? कारण तो आपला घरचा बाप्पा आहे, चांदीचा बनवलेला. पण हा जो दरवर्षी येतो नं आपल्याकडे, तो आहे पाहुणा बाप्पा! या बाप्पाची जी मूर्ती तू मातीपासून बनवली आहेस, ती जर तू नुसतीच ठेवलीस तर खराब होऊन जाईल. म्हणून तिचं विसर्जन करायचं. आणि त्याशिवाय तू नवा बाप्पा कसा बनवणार मग पुढल्या वर्षी?’’ हे ऐकून रिद्धी जरा विचारात पडली.
आजोबा पुढे म्हणाले, ‘‘बाप्पा त्याच्या आईला सोडून दरवर्षी आपल्याला भेटायला येतो. तो थोडे दिवस पाहुण्यासारखा राहतो आपल्याकडे, पण त्याला पुन्हा त्याच्या घरी जायचं असतं. तू कशी मामाकडे पुण्याला रहायला जातेस सुट्टीत, पण थोडय़ा दिवसांनी परत घरी येतेस ना. अगदी तसंच! बाप्पा आपल्याला भेटायला सुट्टी घेऊन येतो म्हणून आपण त्याचं छान स्वागत करतो. त्याला मोदक, गोडधोड वगैरे प्रसाद खायला देतो. पण काही दिवसांनी पुन्हा त्याला त्याच्या घरी जावंच लागतं. कुणाकडे तो दीड दिवसांसाठी येतो, कुणाकडे पाच दिवसांसाठी तर कुणाकडे दहा दिवसांसाठी. त्याचं हे आधीपासूनच ठरलेलं असतं. आणि मला एक सांग? तो जर यावर्षी गेला नाही तर पुढच्या वर्षी पुन्हा कसा येईल बरं?’’
‘‘तो पाण्यातून जातो का मग घरी?’’
‘‘तर! तो पाण्यात विरघळून जातो आणि पुढल्या वर्षी नव्या रूपात आपल्याकडे पुन्हा येतो.’’
‘‘म्हणजे ते कारखान्यातले काका बनवतात त्या रूपात?’’
‘‘अगदी बरोबर!’’ आता रिद्धीला हे हळूहळू पटू लागलं होतं.
‘‘बबडू, आपण एक काम करू या. तुझ्या या गणपती बाप्पाचं घरीच, एका बादलीमध्ये पाण्यात विसर्जन करू या आणि ते पाणी आपल्या बागेतल्या सगळ्या फुलझाडांना घालू या. म्हणजे त्या उमललेल्या सुंदर फुलांतून तुला वर्षभर तुझा बाप्पा भेटत राहील! काय?’’ या कल्पनेने रिद्धी एकदमच खूश झाली आणि झोपण्याआधी तिच्या पाहुण्या बाप्पाला नमस्कार करायला पळाली.

 

प्राची मोकाशी -mokashiprachi@gmail.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 20, 2015 2:05 am

Web Title: guest bappa at my home
Next Stories
1 आर्ट गॅलरी
2 ब्रेन-गेम : अ‍ॅनिमेशनच्या माध्यमातून ज्ञान
3 डोकॅलिटी :
Just Now!
X